विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:09 PM2019-04-16T13:09:31+5:302019-04-16T13:09:45+5:30
विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.
अकोला : भीमटेकडे येथे महाप्रसादाच्या जेवणातून १११ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार आहे.
अकोट तालुक्यातील हिंगणी भीमटेकडी येथे रविवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जेवण केल्यानंतर १११ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. येथील रुग्णांना तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योग्य वेळी उपचार झाल्याने त्या ग्रामस्थांचे प्राण वाचले. त्यांच्या प्रकृतित सुधारणा झाली असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली; परंतु ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचे कारण जाणून घेण्यासाठी जेवणात समाविष्ट प्रत्येक खाद्य पदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. शिवाय, हे खाद्य पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांचे नमुने, तसेच रुग्णांच्या उलटीचे नमुनेदेखील घेण्यात आले आहेत. संकलीत नमुने पुढील तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार असल्याने, डॉक्टरांसोबत सर्वांनाच त्याची प्रतीक्षा आहे.
सर्वच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आली असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाईल. विषबाधेचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी खाद्यपदार्थांसह रुग्णांच्या उलटीचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे अहवाल आल्यानंतरच वास्तव समोर येईल.
- डॉ. श्याम सिरसाम, विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.