गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई
By सचिन राऊत | Published: January 7, 2024 05:42 PM2024-01-07T17:42:04+5:302024-01-07T17:42:28+5:30
पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाेलिसांनी कारवायांचा सपाटा सुरू केला आहे.
अकोला : शहरातील गुटखा विक्रीवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली असून किरकोळ पान टपऱ्यांवरून गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील बहुतांश पाणटपऱ्यांवर कारवाइ करीत त्यांना दंड ठाेठावण्यात आला आहे.
शहरातील जुने शहर पोलिस स्टेशन, डाबकी रोड पोलिस स्टेशन, खदान पोलिस स्टेशन, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन, आकाेट फैल पोलिस स्टेशन, रामदास पेठ पोलिस स्टेशन व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पानटपरीवरून गुटखा विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडण्यात आले आहे. तसेच यापुढे गुटखा विक्री त्यांच्याकडून होणार नाही अशा कडक सूचनाही पोलिसांनी पानटपरी चालकांना दिल्या आहेत.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाेलिसांनी कारवायांचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश पानटपऱ्या बंद असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. असे असले तरीही शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करणारे बडे माफिया मात्र पोलिस कारवाईपासून सध्या तरी दूर असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या कारवायांमुळे पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.