रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रतिष्ठानवर पोलिसांची कारवाई; दहा प्रतिष्ठानाना ठोठावला दंड
By सचिन राऊत | Published: March 30, 2024 06:02 PM2024-03-30T18:02:27+5:302024-03-30T18:02:35+5:30
३२८ वाहनांची केली तपासणी
अकोला : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी २९ मार्चच्या रात्री उशिरा सुरू असलेल्या प्रतिष्ठानांवर कारवाई केली. या दहा प्रतिष्ठानांना दंड ठोठावण्यात आला आहे. अचाणक केलेल्या नाकाबंदी दरम्यान ३२८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ६८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आगामी काळात सण उत्सव व सार्वत्रिक निवडणूक असल्याने पोलीस खबरदारी म्हणून अचानक नाकाबंदी करीत आहेत. २९ मार्च रोजी रात्री अचानक नाकाबंदी केल्यानंतर रामदास पेठ व जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली. यासाठी पाेलिस दलातील नउ अधिकारी ४१ पोलीस अंमलदार, दामिनी पथक, होमगार्ड यांनी ३२८ वाहनांची तपासणी करून ६८ वाहनांना दंड केला. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आठ कारवाया करण्यात आल्या. तसेच रात्री उशिरा सुरू असलेल्या दहा आस्थापनांवर कारवाई करून दंड ठाेठावण्यात आला. येणाऱ्या काळात सन उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे. मात्र त्यानंतरही काही आस्थापना रात्री ११ वाजेनंतर सुरू असल्यास डायल ११२ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळा
यादरम्यान लोकसभा निवडणूक होणार असून जातीय तेढ निर्माण होऊ नये तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रत्येकाने टाळावा असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. कुठेही वादग्रस्त फोटो पोस्ट करू नये आक्षेपार्ह काहीही असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.