अल्पवयीन मुला-मुलीचे प्रेम प्रकरण पाहून पोलीसही अवाक्!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:12 PM2019-02-23T13:12:49+5:302019-02-23T13:14:10+5:30
अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.
अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. कोवळ्या वयात घरून पळून जाण्याचे, संसार थाटण्याचे स्वप्न रंगवित असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. असाच प्रकार शुक्रवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात घडून आला. चिमुरड्या मुलीने प्रियकराला लिहिलेले भावनिक पत्र वाचून पोलीससुद्धा चक्रावून गेले. त्यामुळे अद्याप वेळ गेलेली नाही, माय-बापांनो, मुली सांभाळा..., अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
शुक्रवारी दुपारी मोठ्या उमरीतील आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेत, एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो, शाळेजवळ जाऊन छेड काढतो, अशी तक्रार दिली. पोलिसांनी त्या मुलाला पकडून आणल्यानंतर त्याला समज दिली तर त्याने मुलगीच आपल्याला रात्री-मध्यरात्री फोन करते. भेटायला बोलावते. प्रेमपत्र लिहिते, अशी माहिती दिली. एवढेच नाही, तर त्याने मुलीचे मॅसेज, तिने लिहिलेले पत्रसुद्धा दाखविले. इयत्ता आठवी-नववीत शिकणाऱ्या मुलीने प्रियकराला पिल्लू...लव्ह यू...तू जेवण कर...नाहीतर मीसुद्धा जेवण करणार नाही....आपण पळून जाऊ, खोली करू... संसार थाटू असे एक नाही, तर अनेक भावनिक पत्र लिहिलेले पाहून पोलीससुद्धा चक्रावून गेले होते. आपली मुले-मुली शाळेत, शिकवणीला जातात की नाही, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण, याकडे आई-वडील कधी लक्षच देत नाहीत. पालकांना मुला-मुलींच्या या प्रकरणांची माहिती मिळाल्यावर, त्यांना धक्का बसतो; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरे गत्यंतर राहत नाही. सध्या समाजात घडणारी कोवळ्या वयातील प्रेम प्रकरणे ही पोलिसांसाठी नित्याची डोकेदुखीच बनली आहेत. पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे, मुलीचे समुपदेशन करून मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले आणि त्या अल्पवयीन प्रियकराच्या आई-वडिलांनासुद्धा बोलावून त्यांना समज दिली आणि त्या प्रियकरावर प्रतिबंधित कारवाई करून त्याला सोडून दिले. या घटनेमुळे कोवळ्या वयात एकमेकांविषयी वाढत असणारे शारीरिक आकर्षण, ओढ, सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका याची पाळेमुळे किती खोलवर रुजत आहेत, हे अधोरेखित होते.
पिल्लू तू जेवला नाहीस!
कोवळ्या मनावर कोणते संस्कार होत आहेत, याचीसुद्धा पालकांना जाणीव नाही. १३-१४ वर्षे वयाची मुलगी तिच्या प्रियकराला भावनिक पत्र लिहिते आणि त्यात पिल्लू तुला काय झालं. राग आला, तू बोलत का नाहीस. पिल्लू जेवला नाहीस...! असं म्हणते. तोपर्यंतही पालकांना काहीच कळू नये. यावरून पालक किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते. लक्षात येईपर्यंत काळजाचा तुकडा भुर्रकन उडून गेलेला असतो.
शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुलांचा वावर
शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांसमोर टपोरी मुले उभी राहतात. मुलींची छेड काढतात. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. आकर्षणामुळे काही मुलीसुद्धा भरकटत जातात. शाळा-महाविद्यालयांनीसुद्धा वेळीच याकडे लक्ष देऊन पोलिसांत तक्रार करावी.
आई-वडिलांनी मुला-मुलींबाबत दक्ष राहून ती काय करतात, कुठे जातात, मोबाइलवर कुणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, मुलांना काय अडचणी आहेत, हे जाणून घ्यावे, त्यांचे मित्र बनून संवाद साधला पाहिजे.
-शैलेश सपकाळ,
ठाणेदार,
रामदासपेठ पोलीस स्टेशन.