ट्रकने उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:01 IST2020-04-15T18:01:49+5:302020-04-15T18:01:49+5:30

जिल्हाबंदी व संचारबंदी असताना छुप्या पद्धतीने हे लोक उत्तर प्रदेशकडे निघाले होते.

Police arrest ten men on their way to Uttar Pradesh | ट्रकने उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रोखले!

ट्रकने उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रोखले!

कुरूम : ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून औरंगाबाद येथून उत्तर प्रदेशातील बनारस येथे जाण्यासाठी निघालेल्या ट्रक चालकासह दहा जणांना माना पोलिसांनी अकोला-अमरावती सीमेवरील हयातपूर नाक्यावर रोखले. ही घटना १४ एप्रिल रोजी सकाळी घडली. जिल्हाबंदी व संचारबंदी असताना छुप्या पद्धतीने हे लोक उत्तर प्रदेशकडे निघाले होते. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनामुळे संचारबंदी असून, जिल्ह्याबाहेरील वाहनांनासुद्धा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी पोलीस कर्मचारी बाळू बांगडे हे सहकाऱ्यांसोबत हयातपूर नाक्यावर उपस्थित असताना, अकोलाकडून अमरावतीकडे जाणारा एनएल ०१ एई ०३५६ क्रमांकाचा ट्रक थांबविला. ट्रकची तपासणी केली असताना, ट्रकमधील कॅबिनमध्ये ट्रक चालकासह ९ जण प्रवास करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रक चालक, क्लीनरची चौकशी केली असता, त्यांनी उत्तर प्रदेशातील बनारस येथे जाण्यासाठी १२ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून निघालो असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेल्या सर्व लोकांना खाली उतरविले. याबाबतची माहिती ठाणेदार संजय खंडारे यांना देण्यात आल्यावर ठाणेदार खंडारे यांनी हयातपूर चेकपोस्टवर येऊन सर्व लोकांची चौकशी केली आणि त्यांना कुरूम येथील पंचशील विद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले. ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रकच्या कॅबिनमध्ये एकूण नऊ लोकांना अवैधरीत्या बसवून कोरोना विषाणू संसर्ग पसरविण्याचा संभाव्य धोका असूनसुद्धा त्यांना बनारस येथे सोडण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९ नुसार गुन्हा दाखल केला. 


दहाही प्रवाशांची वैद्यकीय तपासणी
औरंगाबाद येथून निघालेल्या ट्रकने पाच ते सहा जिल्ह्यांच्या सीमा ओलांडल्या. संचारबंदी, नाकाबंदी असतानासुद्धा ट्रक चालकासह दहा जणांना कुणी हटकले कसे नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रकमधील सर्व दहाही लोकांनी वैद्यकीय तपासणी करून त्यांची पंचशील विद्यालयात विलगीकरण कक्षात व्यवस्था करण्यात आली. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुनील डाबेराव, पोलीस पाटील वसंत विरुळकर हे व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, तहसीलदार प्रदीप पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, नायब तहसीलदार आर. बी. दाबेराव यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Police arrest ten men on their way to Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.