अकोटात पोलिसांचे बॅरिकेड्स बनले मोकाट श्वानांसाठी विश्रांतीस्थळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 03:44 PM2019-12-17T15:44:21+5:302019-12-17T15:44:28+5:30

अकोट शहरातील शिवाजी चौकात भर रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे श्वान पोलिसांचे बॅरिकेड्समध्ये राहत असल्याचा  प्रकार पाहायला मिळत आहे.

Police barricades become a shelter for dogs in Akot! | अकोटात पोलिसांचे बॅरिकेड्स बनले मोकाट श्वानांसाठी विश्रांतीस्थळ!

अकोटात पोलिसांचे बॅरिकेड्स बनले मोकाट श्वानांसाठी विश्रांतीस्थळ!

googlenewsNext

- विजय शिंदे
अकोटः एकीकडे निवासाकरीता शासनाच्या विविध योजना आहेत,पंरतु मुक्या, मोकाट जनावराकरीता हक्काची घरे नाहीत. पंरतु अकोला-हरीसाल या २०४ क्रमांकाच्या राज्य महामार्गावर श्वानाचे (कुत्र्याचे) सुरक्षित गृह अस्तित्वात आले आहे, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खंर आहे. अकोट शहरातील शिवाजी चौकात भर रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे श्वान पोलिसांचे बॅरिकेड्समध्ये राहत असल्याचा  प्रकार पाहायला मिळत आहे.  अकोट शहरातुन जाणारा राज्य महामार्ग दर्यापूर, अकोला, परतवाडा, तेल्हारा, हरिसाल या मार्गाला जोडणारा एकमेव मार्ग आहे.त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. तसेच शहरातील सर्व प्रकारच्या वाहतुकीची वर्दळ असल्याने अनेकदा वाहतुक प्रभावीत होते. महत्त्वाचा शिवाजी चौक या महामार्गावर आहे. त्यामुळे हा चौक नेहमीच गदीँने गजबजलेला असतो. बाहेरगावाहून येणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, या ठिकाणी ठिय्या देऊन असतात. त्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अकोट शहरात रस्त्याच्या वाहतुकीचा धक्का लागल्याचे कारणावरून दंगली उसळलेल्या आहेत. त्यामुळे राज्य महामार्गावरील वाहनांची संख्या व  वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेता.  अकोला नाका ते विश्राम गृहापर्यंत या  रस्ता रुंदीकरण कामाकरीता कोट्यावधीचा निधी २०१५ मध्ये देण्यात आला. या निधी मधुन रस्त्याचे चौपदरीकरण, दुभाजक व नाल्यासह इतर कामांचा कार्यारंभाचे आदेश देण्यात आहे,लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या थाटात गाजावाजा केला. पंरतु राज्य महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम पाच वर्षापासून रखडत राहीले. वाहतुकीची समस्या जैसे थे झाली शिवाजी चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने व किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने वाद-विवाद विकोपाला झाल्याच्या घटना घडत होत्या. वाहतुक व्यवस्था विस्कळीत झालेली असते. नागरीकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागता, पायदळ चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा स्थितीत ही कोंडी दूर करण्याकरीता आकोट शहर पोलिस प्रशासनाने सण, उत्सव व कायदा-सुव्यवस्था कामाकरीता असलेले पोलिसांचे लोखंडी बॅरिकेट्सचा वापर रस्त्याच्या दुभाजक करीता केला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. पंरतु या बॅरिकेड्स सदुपयोग भटक्या व मुक्या जनावरांना सुद्धा सुरक्षितपणे झाल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध भरधाव वाहतूक सुरू असताना जीवाची पर्वा न करता शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी या बॅरिकेड्सचा वापर आपले घर वसविण्याकरीता सुरु केला आहे. या लोखंडी बॅरिकेड्स मजबूत तारेच्या जाळ्या आहेत. शिवाय बॅरिकेट्समध्ये बसण्याची व  झोपण्याची सुरक्षित व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नसल्याने शहरातुन फिरुन  आलेले कुत्रे बिनधास्तपणे  या सुरक्षित ठिकाणी विश्रांती घेतांना दिसतात. या सुरक्षित विश्रांतीगृहामुळे  या ठिकाणावरील रस्त्यांवर वाहनांच्या अपघातामुळे मृत्यू व अपंग होणाऱ्या कुत्र्यांची संख्या काही दिवसांपासून घटल्याचे दिसत आहे.

Web Title: Police barricades become a shelter for dogs in Akot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.