पोलिसांना मारहाण : दोघांना दोन वर्षांचा कारावास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:05 PM2020-01-04T12:05:15+5:302020-01-04T12:05:23+5:30
सुनावणीदरम्यान न्यायालयाने शुक्रवारी एक पोलीस कर्मचारी व शाळेतील कर्मचाºयास दोन वर्षांचा कारावास, आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अकोला: सिग्नल तोडून वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकीस्वारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या प्रकरणात प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने शुक्रवारी एक पोलीस कर्मचारी व शाळेतील कर्मचाºयास दोन वर्षांचा कारावास, आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
वाहतूक पोलीस कर्मचारी बळीराम इंगळे व शरद सांगळे हे दोघे १८ आॅक्टोबर २०१५ रोजी हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात कर्तव्यावर होते. आरोपी शेखर श्रीधर तायडे आणि उमेश अंबादास तेलगोटे हे चांदेकर चौकाकडून दुचाकीवर आले. दरम्यान, त्यांनी सिग्नल तोडल्यामुळे पोलीस कर्मचाºयांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर वाहतूक नियमानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेखर तायडे व उमेश तेलगोटे यांनी कारवाईमध्ये अडथळा निर्माण करीत, दोन्ही पोलीस कर्मचाºयांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने भादंवि कलम ३५३ नुसार दोन वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने प्रत्येकी अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि कलम ३३२ नुसार दोन वर्षे प्रत्येकी सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच शेखर तायडे याला कलम ११९, सह कलम १७७ मोटार वाहन कायद्यानुसार शंभर रुपये दंंड, न भरल्यास तीन दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपींना या शिक्षा एकाचवेळेस भोगायच्या आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ राजेश अकोटकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)