नवदुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांचा लाठीमार
By admin | Published: October 13, 2016 03:11 AM2016-10-13T03:11:49+5:302016-10-13T03:11:49+5:30
बोरगाव मंजू येथे पोलिसांचा अतिरेक; नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यात तणाव.
बोरगाव मंजू, दि. १२- येथे निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत रात्री १0 नंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून तणाव निर्माण झाला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचवेळी रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मिरवणुकीच्या स्थळीत येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला यामध्ये तिन युवक जखमी झाले आहेत.
बोरगाव मंजू येथे बुधवारी नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री १0 वाजता एका पोलिसाने मंडळाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. ही बाब मंडळाच्या इतर सदस्यांना माहिती होताच सर्वच मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मिरवणूक थांबवण्यात आली. रात्री १२ वाजेपर्यंत ही मिरवणूक थांबलेली होती. तणाव वाढत असल्याने अकोल्यावरून अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. अकोल्यावरून आलेल्या रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणे सुरू केले. त्यामध्ये बालु ढवळे, मयुर जयस्वाल, आयुष जयस्वाल हे तिन युवक जखमी झाले. या प्रकारामुळे मिरवणुकीचे वातावरण आणखी तणावग्रस्त झाले होते. ही माहिती मिळताचे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. काही कार्यकर्त्यांनी आमदार रणधीर सावरकरांना ही माहिती दिल्याने त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, अधिकार्यांनी मंडळाच्या अध्यक्षांशी चर्चा करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मिरवणुकीला रात्री १२ वाजता पुन्हा सुरुवात झाली.
पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप
बालु ढवळे, मयुर जयस्वाल, आयुष जयस्वाल या तिन युवकांना पोलिसांच्या लाठयांचा जबार मार बसला. या युवकांची आमदार रणधीर सावरकर यांनी भेट घेतली असता पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आ.सावरकर यांच्याकडे केला. या प्रकाराची आ.सावरकांनी दखल घेतली असुन पोलिसांना या प्रकाराचा जाब विचारला जाईल असे आश्वासन दिले. वृत्त लिहेपर्यंत दोनशे लोकांचा जमाव पोलिस स्टेशनवर तक्रार देण्यासाठी दाखल झाला होता.