रात्रगस्तीत पोलीस सतर्क; दंगा नियंत्रण पथकाची रात्रभर गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:11 PM2019-05-13T13:11:20+5:302019-05-13T13:13:46+5:30
अकोला: शहरात पोलिसांचा बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांमधील मध्यरात्रीच्या कामकाजाची लोकमतच्या चमूने शनिवारी मध्यरात्री पाहणी केली असता पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले.
- सचिन राऊत
अकोला: शहरात पोलिसांचा बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांमधील मध्यरात्रीच्या कामकाजाची लोकमतच्या चमूने शनिवारी मध्यरात्री पाहणी केली असता पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले. तर दंगा नियंत्रण पथकाची रात्रभर शहरात गस्त चालू असल्याचेही लोकमतच्या मध्यरात्रीचे अकोला शहर या विशेष पाहणीत स्पष्ट झाले. पोलिसांना रात्री उशिरा मद्यधुंदांचा प्रचंड त्रास असल्याची माहिती त्यांनी दिली.
मध्यरात्रीनंतरचे अकोला शहर हे विशेष सदर लोकमतद्वारे चालविण्यात येत आहे. यामध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर अकोला शहरातील पोलीस ठाणे तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली असता यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सतर्क असल्याचे दिसून आले. पोलीस ठाण्यांच कामकाजही योग्यरीत्या सुरू असल्याचे या रात्र पाहणीत समोर आले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावूनच महिला कर्मचारीही रात्र गस्त तसेच पोलीस ठाण्यांचे कामकाज सांभाळताना दिसल्या. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री १ वाजेच्या दरम्यान पाहणी करीत असताना एक कुटुंबीय तक्रार देण्यासाठी आले होते. तर खदान पोलीस ठाण्यासमोर पोलिसांचे वाहन तपासणी तसेच रात्र गस्त सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून, त्यांनीच पोलीस ठाण्याचे कामकाज हाताळल्याचे लोकमतच्या पाहणीत समोर आले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसर आणि सातव चौकामध्ये दंगा नियंत्रण पथक गस्तीत असल्याचे या पाहणीत समोर आले. अकोट फैल पोलीस ठाण्यातही अधिकारी आणि कर्मचारी एका परिसरात वाद सोडविताना त्रस्त होते. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीके चौक परिसरात पोलीस कार्यरत होते. डाबकी रोड पोलिसांचेही कामकाज सुरू असल्याचे समोर आले असून, त्यांची गोडबोले प्लॉट रेणुका नगर परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास गस्त सुरू होती. जुने शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाशिम बायपास परिसरात वाहनांची तपासणी करताना दिसले तर ठाण्याचे कामकाजही यावेळी सुरळीत दिसून आले. एकूणच शहरात पोलिसांची गस्त सुरू असल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीमध्ये दिसून आले.
महिलांसाठी हवा स्वतंत्र कक्ष
महिला कर्मचारी रात्र ड्युटी करीत असताना त्यांना स्वतंत्र कक्ष असणे गरजेचे असल्याची माहिती काही महिला पोलीस कर्मचाºयांनी दिली. पोलीस ठाण्यांमध्ये महिलांसाठी स्वतत्र कक्ष असला तर त्यांची कुचंबणा होणार नसल्याची माहिती पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाºयांनी दिली.