पोलिसांच्या सतर्कतेने झाले चोरटे जेरबंद !
By admin | Published: November 7, 2016 02:31 AM2016-11-07T02:31:41+5:302016-11-07T02:31:41+5:30
पोलीस कर्मचा-यांना पुरस्कार; वरिष्ठ पोलीस अधिका-यांची घटनास्थळी भेट.
जळगाव जामोद, दि. ६- करणवाडी नाक्यावर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सामान्य नागरिकांकडून कौतुक होत असून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
५ नोव्हेंबरच्या रात्री नांदुरा रोड लगतच्या भय्यानगरात चोरट्यांनी शेजार्यांच्या घरांच्या कड्या लावून घेतल्या व म्हसाळ तथा सातव यांच्या घरात घुसले. महिलेच्या गळ्यातील पोत तोडली तेव्हा आरडाओरड केली. दरम्यान, संतोष म्हसाळ हे मागील दरवाज्यातून घराबाहेर पडले. चोर-चोर असे ओरडत असताना पळ काढणार्या चोरट्यांनी त्यांच्या हातावर व डोक्यावर काठीने मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर तेथून चोरटे पसार झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सुटीवर असलेले ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी तत्काळ नाकेबंदीच्या सूचना केल्या. तर प्रभारी ठाणेदार जाधव यांनी लगेच बंदोबस्त तगडा केला. तेव्हा विदर्भ, खान्देशच्या सीमेवर करणवाडी ज्या ठिकाणावरून चोरटे मुक्ताईनगरकडे पसार होणार होते. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस पाटील तथा पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे व त्यांचे सहकारी यांनी चोरट्यांची चारचाकी गाडी अडविली. हा प्रकार पाहून गाडीमधून उतरताच सदर चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पीएसआय मुपडे यांनी हवेत फैरी झाडल्या. त्यामुळे पलायन करणार्या चोरट्यांचा पाठलाग करीत त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर व आणखी एक अशा दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, रविवारी ६ नोव्हेंबरच्या सकाळी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विजय बाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोळंके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दरेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
रात्रीच्या वेळी करणवाडी नाक्यावर चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे, गणेश पाटील, प्रमोद मुळे आणि शत्रुघ्न बर्डे यांचा समावेश होता. या घटनेमुळे जळगाव जामोद परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.