पोलीस चौकीही भुईसपाट!

By admin | Published: March 5, 2017 01:49 AM2017-03-05T01:49:00+5:302017-03-05T01:49:00+5:30

चौथ्या दिवशीही अकोटात राबविली अतिक्रमण हटाव मोहीम.

Police Chowki Bhuiyapat! | पोलीस चौकीही भुईसपाट!

पोलीस चौकीही भुईसपाट!

Next

अकोट, दि. ४- अकोट-अंजनगाव मार्गावर असलेल्या अतिक्रमणामधील अकोट शहर पोलीस स्टेशनची पोलीस चौकी ४ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत भुईसपाट करण्यात आली. गत चार दिवसांपासून या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये चौपदरीकरणाकरिता रस्त्याच्या आड येत असलेली अतिक्रमणे पाडण्यात येत आहेत. आतापर्यंत ७५ च्यावर घरे पाडण्यात आली असून, किरकोळ अतिक्रमणसुद्धा पाडण्यात आले आहे.
नगर परिषदेपासून खाई नदीच्या पुलापर्यंंत या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शनिवारी उर्दू शाळेसमोरील धारुळी वेसवर पक्के बांधकाम केलेली पोलीस चौकीसुद्धा भुईसपाट करण्यात आली. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण पाडण्यात आल्याने रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात मलबा पडला आहे. काही घरे व पक्क्या इमारतींसमोरील भाग पाडण्यात आला आहे. शिवाय, अतिक्रमण पाडल्यानंतर पाणीपुरवठय़ाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही मोहीम अजूनही तीन ते चार दिवस सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी गीता ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घुमरे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असून, मोहिमेमध्ये कार्यालय पर्यवेक्षक मयूरी जोशी, आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार, गजानन महल्ले, मोहन नाथे, न.पा. अभियंता स्नेहल बोमकंटीवार, संजय अढाऊ आदींसह विविध विभागाचे कर्मचारी हजर होते.

पक्की अतिक्रमणे अर्धवट पाडली
अंजनगाव मार्गावरील गोरगरिबांची घरे पूर्णत: भुईसपाट करण्यात आली आहेत, त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरकुलेसुद्धा पाडण्यात आली आहेत. काही बिल्डर लॉबीने या मार्गावर पक्की बांधकामे करून दुकाने बांधली आहेत. नगर परिषदेची बांधकाम परवानगीसुद्धा घेण्यात आली नाही, अशी अतिक्रमणे मात्र अर्धवट स्थितीतच पाडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या गरिबांची घरे पूर्णत: पाडण्यात आली. त्यांच्यामध्ये या मोहिमेतील धरसोडवृत्ती पाहून भेदभावाची भावना निर्माण होत आहे. प्रशासनाने कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता व भेदभाव न करता पारदर्शकपणे ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Police Chowki Bhuiyapat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.