मोबाइल शॉपी फोडणा-या चोरट्यांना पोलीस कोठडी!
By admin | Published: July 20, 2016 01:35 AM2016-07-20T01:35:48+5:302016-07-20T01:35:48+5:30
पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल ३५ मोबाइल हस्तगत केले.
अकोला: सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोहित मोबाइल शॉपी फोडून मोबाइलसह मुद्देमाल लंपास करणार्या अट्टल चोरट्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी या चोरट्याकडून तब्बल ३५ मोबाइल हस्तगत केले आहेत. जुन्या कापड बाजारात रोहित सिंगल यांच्या मालकीची रोहित मोबाइल शॉपी आहे. या मोबाइल शॉपीत १९ जून रोजी अज्ञात चोरट्याने धुडगूस घालीत सुमारे ३५ मोबाइल व रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला होता. या प्रक रणी सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी कर्मचार्यांना कामाला लावून या चोरीचा काही दिवसातच छडा लावला. रोहित मोबाइल शॉपी फोडणारा अट्टल चोरटा शेख जुनेद शेख निजाम आणि त्याचा साथीदार लखन नावकार या दोघांना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ३५ मोबइल जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही चोरट्यांना अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेख जुनेद याने शहरात आणखीही काही चोर्या केल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील आणखी काही घरफोड्या व चोर्यांची माहिती उघड होणार आहे.