दाेन काेटींच्या फसवणुकीतील आराेपीस पाेलीस काेठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:16 AM2021-07-05T10:16:53+5:302021-07-05T10:17:13+5:30
Police custody to accused : शेख जावेद शेख हुसेन कादरी यास रविवारी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीस ८ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.
अकाेला : अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल ११ ट्रेडिंग कंपन्यांकडून सुमारे एक काेटी ८७ लाखांचे साेयाबीन खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या नर्मदा साॅल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचा अधिकृत प्रतिनिधी लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशन या दाेन कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध रामदास पेठ पाेलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर अटकेत असलेला शेख जावेद शेख हुसेन कादरी यास रविवारी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीस ८ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.
गाैरक्षण राेडवरील सहकारनगर येथील रहिवासी सतीश शांतीलाल जैन यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत कंपन्यांकडून नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया आणि त्यांचाच अधिकृत प्रतिनिधी असलेला लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी यांनी माेठ्या प्रमाणात साेयाबीन खरेदी केेले. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत्यांकडून त्यांनी तब्बल एक काेटी ८७ लाख ७८ हजार ४९१ रुपयांचे साेयाबीन एप्रिल व मे महिन्यांत खरेदी केल्यानंतर काेराेनाच्या नावाखाली पैसे देण्यासाठी वेळ मागितला. अडत्यांनीही अडचण समजून घेत बरेच दिवस देयक सादर केल्यानंतरही पैसे मागितले नाही. मात्र, सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर ११ अडत्यांनी पैसे मागितले असता लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी याने संबंधितांचे पैसे मुख्य खरेदीदार नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया हा देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अडत्यांनी रुहाटीया यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यानेही पैसे देण्यास नकारघंटा दिली. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सतीश जैन यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी दाेन्ही आराेपींसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी शेख जावेद शेख हुसेन कादरी यास अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने ८ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
रुहाटीयास ताब्यात घेतल्याची चर्चा, नंतर पसार
नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया यास रामदास पेठ पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर त्यास सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून एका माेठ्या खासगी रुग्णालयात हलविल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. मात्र, रुहाटीया यास पाेलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात नेताना पाेलीस बंदाेबस्त का ठेवला नाही, असा सवाल अडत्यांनी उपस्थित केला आहे. रुहाटीयाच्या पसार हाेण्यामागे ज्यांचा हात आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी अडत्यांकडून करण्यात येत आहे.