खपाटे हत्याकांडातील दोघांना पोलीस कोठडी
By admin | Published: July 4, 2017 02:42 AM2017-07-04T02:42:48+5:302017-07-04T02:42:48+5:30
अकोला: विकास ऊर्फ विक्की खपाटे याची २६ जून रोजी दुपारी नितीन शाहू, करण शाहू, चेतन शाहू, राजेश कोटोले यांनी जुन्या वादातून आणि व्याजाच्या व्यवसायातून निर्घृण हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: हरिहरपेठेतील गाडगे नगरात राहणारा विकास ऊर्फ विक्की खपाटे याची २६ जून रोजी दुपारी नितीन शाहू, करण शाहू, चेतन शाहू, राजेश कोटोले यांनी जुन्या वादातून आणि व्याजाच्या व्यवसायातून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपी नितीन प्रकाश शाहू (२६), करण अशोक शाहू (२५) यांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विक्की खपाटे याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय वाढविला होता. त्याने या व्यवसायात केलेली प्रगती पाहून, आरोपी नितीन शाहू, करण शाहू, चेतन शाहू, राजेश कोटोले यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरविले. आरोपीसुद्धा व्याजाचा व्यवसाय करीत असल्याने, विक्की त्यांच्या व्यवसायात अडसर ठरत होता. तसेच विक्की खपाटे याच्यासोबत आरोपींचे जुने वाद होते. त्यामुळे आरोपींनी विक्कीवर लोखंडी पाइप व फरशी कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. जुने शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नितीन शाहू, करण शाहू आणि राजेश काटोले यांना अटक केली होती. शाहू बंधूंना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने, पोलिसांनी त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ जी.एल. इंगोले यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. याला आरोपीच्या विधिज्ञांनी विरोध केला.
यासाठी हवी पोलीस कोठडी
पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करायची आहे. फरार आरोपींची माहिती घ्यायची आहे. त्यांनी विक्की खपाटेची हत्या कोणत्या कारणासाठी केली, याची सखोल चौकशी करायची असल्याने, आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर आपला निर्णय दिला.