लाच प्रकरणी कार्यकारी अभियंत्यास पोलीस कोठडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 03:31 PM2020-02-01T15:31:11+5:302020-02-01T15:31:22+5:30
शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अकोला: दोन सोलारचे प्लांटचे निरीक्षण करून फाइल अधीक्षक अभियंत्याकडे पाठविण्यासाठी १२ हजारांची लाच घेताना कार्यकारी अभियंत्यास अटक करण्यात आली होती. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शहरातील २५ वर्षीय तक्रारकर्त्यांच्या तक्रारीनुसार, दोन सोलारचे प्लांटचे निरीक्षण करून फाइल अधीक्षक अभियंत्याकडे पाठविण्यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप रूपराव पुनसे (वय ५३) याने १५ हजार लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार लाच देण्याचे ठरले. यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. यादरम्यान गोरक्षण रोडवरील महावितरण कार्यालय चाचणी विभाग येथे लाचखोर अभियंत्यास १२ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली होती. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने लाचखोर अभियंत्यास ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.