ठाणेदाराला लाच देणाऱ्या जुगार माफियांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:17+5:302021-05-24T04:17:17+5:30
दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तसेच देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या होत ...
दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तसेच देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या होत असलेली विक्री बंद केली. त्यामुळे त्यांना लाच देण्याचे आमिष दाखवून हे गोरखधंदे सुरू करण्याचा प्रयत्न काही जुगार माफियांनी सुरू केला होता; त्यामुळे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी जुगार माफिया आमिष दाखवत असल्याची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवा गोपाळराव मगर (वय ३०) राहणार अकोट, अभिजीत रविकांत पागृत (वय ३१) रा. आकोट व घनश्याम गजानन कडू राहणार लोतखेड तालुका अकोट या तिघांना लाच देण्याचा प्रयत्न करीत असताना रंगेहात अटक केली. या जुगार माफियांविरुद्ध दहीहंडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपी वाढण्याची शक्यता
तीन जुगार माफियांनी दहीहंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू करण्यासाठी ठाणेदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार माफिया देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या अनेकांचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती आहे. त्यामुळे काळे धंदे करणारे आणखी काही आरोपी या प्रकरणात वाढण्याची शक्यता आहे.
एसीबीच्या तपासावर लक्ष
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन जुगार माफियांना अटक केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे २४ मे रोजी या तपासात काय आढळले ते न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये आणखी काही आरोपी वाढणार आहेत का, याचीही माहिती समोर येणार आहे. अटकेतील तीन आरोपींना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी होणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.