पोलिसांवर दगडफेक करणारे अटकेत; हिंसक आंदोलकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:30 AM2018-01-04T01:30:20+5:302018-01-04T01:37:07+5:30
अकोला : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्यांवर खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्यांवर खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोट फैल पोलिसाचे एमएच - ३0 - एच - ४0९ क्रमांकाचे वाहन मंगळवारी रात्री घुसर परिसरात गस्त घालीत होते. यावेळी घुसर येथील रहिवासी किशोर भास्कर इंगळे (३४), चंद्रशेखर संजय वानखडे (२२) या दोघांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करीत हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजीव राऊतसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर सदर दोन आरोपींचा शोध घेण्यात आला. या दोघांनीच दगडफेक केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी पोलीस कर्मचारी केशव सीताराम बुरंगे यांच्या तक्रारीवरून सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिंसक आंदोलकांवर गुन्हा दाखल
कोरगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद आंदोलनाला हिंसक वळण देणार्यांवर खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनांची तोडफोड करणे, प्रतिष्ठानांवर दगडफेक करणे, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण देणार्या हिंसक आंदोलकांवर खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सीसी टीव्ही फुटेज घेण्यात आले असून, यामध्ये अनेक आंदोलकांची ओळख पटली असून, काही आंदोलक पोलिसांच्या कॅमेर्यात कैद झाले आहेत.
त्यामुळे या प्रकरणी खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १४३ गैरकायदेशीर मंडळी जमविणे , १४५ पोलिसांच्या आवाहनाला बगल देणे, १४७ दंगल घडविणे, १४९ दंगल घडविण्यात सहभागी असणे, ४२७ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, तसेच कलम ३ व ४ सार्वजनिक मालमत्ता नासधूस करणे आाणि कलम १३५ मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन करणे, हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.