मोहल्ला, शांतता समिती होणार पोलीस मित्र समिती!
By admin | Published: July 6, 2017 12:51 AM2017-07-06T00:51:40+5:302017-07-06T00:51:40+5:30
आदेशाची अंमलबजावणी नाही : सदस्यांचे व्हेरिफि केशन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पूर्वीच्या मोहल्ला व शांतता समितीचे रूपांतर लवकरच पोलीस मित्र समितीत होणार आहे; मात्र जातीय सलोखा राखणाऱ्या या समिती सदस्यांना मात्र पोलीस व्हेरिफिकेशनच्या चाळणीतून जावे लागणार आहे.
जातीय सलोखा राखण्यासाठी पूर्वी मोहल्ला, शांतता आणि समन्वय समितीचे पदाधिकारी पुढाकार घ्यायचे. ही समिती पोलिसांच्या खांद्याला-खांदा लावून काम करीत असे. दंगल असो किंवा धार्मिक उत्सव यामध्ये या पदाधिकाऱ्यांचे मत पोलीस अधिकारी विचारात घेत असत.
त्यामुळे या समितीच्या पदाधिकाऱ्यांचे वजन सामाजिकदृष्ट्या महत्वाचे झाले होते; कालांतराने सामाजिक कार्याचा बनाव करून समितीमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश मिळविला. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली; मात्र आहे तशी समिती कार्यरत राहिली. त्या विसर्जित झाल्या नव्हत्या. दरम्यान, १५ जुलै २०१५ रोजी मोहल्ला आणि शांतता समिती बरखास्त करून या समितीचे रूपांतर पोलीस मित्र समितीत करण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयाचे उपसचिव सुनील जयकुमार सोवितकर यांनी बजाविले. या अध्यादेशास आता दोन वर्षे पूर्ण झाले असले, तरी अंमलबजावणी झाली नाही.
अकोल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रु जू झालेल्या राकेश कलासागर यांनी आता पुढाकार घेतला आहे. राज्य, जिल्हा, तालुका आणि पोलीस ठाणे स्तरावर पोलीस मित्र समिती नव्याने गठित केली जाणार आहे. त्यात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, नगरसेवक, शिक्षक, दुकानदार, उद्योजक यांचा समावेश करण्याचे सूचविलेले आहे. या सदस्यांना मात्र चारित्र्य पडताळणीच्या पोलीस तपासातून जावे लागणार आहे. कंटरपंथी आणि सक्रिय राजकीय कार्यकर्ते या समितीत घेऊ नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहे. धार्मिक सण आणि महोत्सव आता जवळ येत असल्याने या समितीची गरज आहे.
पोलीस मित्र संकल्पनेतून आम्ही काहींची निवड केली असून, शहर वाहतूक शाखेच्या कामात त्यांची मदत घेत आहोत. मोहल्ला आणि शांतता समिती बरखास्त करून नव्याने जिल्हा, तालुका पातळीवर पोलीस मित्र समिती गठित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
-राकेश कलासागर,
जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला.