अवैध सावकारांवर पोलिसांची मेहेरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:38 PM2019-01-15T12:38:10+5:302019-01-15T12:39:45+5:30
अकोला: जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या विरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून, तब्बल शेकडो खरेदी-विक्री व इसाराचे अवैध दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.
- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या विरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून, तब्बल शेकडो खरेदी-विक्री व इसाराचे अवैध दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये श्याम लोहिया या अवैध सावकाराच्या घरातूनही मोठे दस्तावेज जप्त करण्यात आले. लोहियाने घरात येऊन दोनदा धाकदपट केल्यामुळेच तुकाराम जाधव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली; मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केल्याने या अवैध सावकारांवर पोलिसांची मेहेरनजर असल्याचे स्पष्ट होत आहे.
तुकाराम मारोती जाधव यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी रामदासपेठेतील रहिवासी अवैध सावकार शामसुंदर लोहिया यांच्याकडून ३ लाख रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. तर यामधील १ लाख रुपये लोहिया व विठ्ठल टाले या दोघांनी व्याजापोटी जागेवरच परत घेतले. या मोबदल्यात श्याम लोहिया याने तुकाराम जाधव यांचे रिधोरा शेतशिवारातील १ हेक्टर ५३ आर शेतीचा इसार केला. जाधव यांनी इसार करण्यास नकार दिला असता केवळ सुरक्षेसाठी हा इसार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शंभर रुपयांच्या बॉण्डवर ३ लाखांऐवजी १० लाख रुपयांमध्ये इसाराचा व्यवहार झाल्याचे नमूद करीत जाधव या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. त्यानंतर या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांकडे अवैध सावकारीच्या तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली; मात्र त्यानंतर १३ जुलै २०१८ रोजी श्याम लोहिया व त्याच्या साथीदारांनी तुकाराम जाधव यांच्या निवासस्थानी धुडगूस घातला. या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली; मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. १३ नोव्हेंबर रोजी असाच हैदोस घातल्याने १४ नोव्हेंबरच्या पहाटे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला; मात्र पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. शारदा जाधव यांनी या प्रकरणाची तक्रार व अवैध सावकारीची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. त्याच दिवशी जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने श्याम लोहिया याच्या निवासस्थानी छापेमारी करीत अवैध सावकारी व्यवहाराचे ६७ खरेदी खत, ५ मुखत्यारपत्र व ५०० आणि १०० रुपयांचे कोरे बॉण्ड, एक समझोता लेख, एक इसार पावती, ४ ताबा पावती, एक टोकन पावती व २८ सातबारा व फेरफार असा मोठा साठाच आढळल्याने तुकाराम जाधव व त्यांच्या पत्नीच्या तक्रारी वास्तव असल्याची माहिती आहे.