खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सायरे निलंबित

By आशीष गावंडे | Published: May 22, 2024 09:09 PM2024-05-22T21:09:55+5:302024-05-22T21:10:08+5:30

नागपूर येथील युवतीच्या विनयभंग प्रकरणी जामीन फेटाळला

Police Inspector Sayre of Khana Police Station suspended | खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सायरे निलंबित

खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सायरे निलंबित

अकाेला: स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढण्याचा आराेप असलेले खदान पाेलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे (५३)रा.अकाेला यांच्या विराेधात नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सायरे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच याप्रकरणी विभागीय चाैकशीचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सायरे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  

निलंबित पाेलिस निरीक्षक धनंजय सायरे हे मुळ अमरावतीचे रहिवासी आहेत. पीडित तरुणीही अमरावतीची असून, तिचे वडील सायरे यांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ही तरुणी नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून, ती नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. याबाबत सायरे यांना कळाले असता, त्यांनी तरुणीशी संपर्क साधून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ती मदत करण्याची हमी दिली. त्यानंतर ते नियमितपणे मोबाइलद्वारे तरुणीशी संपर्क साधायला लागले. मी अनेकांचे करिअर घडविले आहे. तुझेही करिअर घडवेल. मी तुला नेहमीच मार्गदर्शन करेल,असे ते म्हणाले. सायरे सतत संपर्क साधत असल्याने तरुणीला संशय आला. याबाबत तिने आई-वडिलांना सांगितले. पालकांनी तिला दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. १८ मे राेजी सायंकाळी सायरे तरुणीच्या घरासमोर आले. घरापासून काही अंतरावर सायरे यांनी तरुणीला अडवत तिचा हात पकडत छेड काढली. याप्रकरणी तरुणीने तातडीने नंदनवन पोलिस स्टेशन गाठत सायरे यांच्याविराेधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून सायरे फरार आहेत. 


सायरे यांचे निलंबन; पाेलिस दलात निरव शांतता
शहरात एकूण आठ पाेलिस ठाणे आहेत. त्यापैकी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांची दबंग व कर्तव्याला प्राधान्य देणारा अधिकारी अशी ओळख हाेती. पाेलिस प्रशासनाने सायरे यांच्या निलंबनाचा आदेश जारी केल्यानंतर पाेलिस दलात निरव शांतता पसरल्याचे चित्र आहे. 


अटकपूर्व जामीन फेटाळला
निलंबित पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांनी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने नागपूर पोलिसांना ‘से’ मागितला होता, त्यानुसार पोलिसांनी ‘से’ दाखल केला. २२ मे रोजी सायरे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता, एफआयआरमध्ये नमूद बाबी लक्षात घेता त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Web Title: Police Inspector Sayre of Khana Police Station suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला