दामिनी पथकातील पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटले!

By admin | Published: June 2, 2017 01:55 AM2017-06-02T01:55:35+5:302017-06-02T01:55:35+5:30

दोन्ही पोलीस निलंबित: छेडखानी रोखण्यासाठी सुरू केलेल्या पथकाचा गैरवापर

Police looted Ugulaya lover of Damini Squad | दामिनी पथकातील पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटले!

दामिनी पथकातील पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील छेडखानीच्या घटनांना आळा बसावा या शुद्ध हेतूने पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेले दामिनी पथक प्रेमी युगुलांना पकडून, त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना लुटत असल्याची घटना उघडकीस आली. दामिनी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अन्नपूर्णा मंदिराजवळ रविवारी एका प्रेमी युगुलाला पकडून, त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी सहा हजार रुपये घेतले; परंतु प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात आल्यावर या कर्मचाऱ्यांनी पैसे परत केले. हा प्रकार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या कानावर गेल्यावर, त्यांनी तडकाफडकी पोलीस कर्मचारी सागर सिरसाट आणि शैलेश पाचपोर यांना निलंबित केले.
पोलीस अधीक्षक गुन्हेगारांवर, छेडखानी करणाऱ्या टारगट युवकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दामिनी पथकासोबतच इतर तपास पथके स्थापन करतात. या पथकांनी चांगले काम करून गुन्हेगारांना वठणीवर आणले पाहिजे; परंतु हीच पथके गुन्हेगारांना सोडून सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या घटना अनेकदा घडतात. असा काहीसा प्रकार रविवारी अन्नपूर्णा माता मंदिराजवळ घडला. संग्रामपूर येथील एक युवक आणि शिक्षणासाठी अकोल्यात असलेल्या तेथीलच एका युवतीला भेटण्यासाठी रविवारी अकोल्यात आला. दोघे अन्नपूर्णा मंदिराजवळ भेटले. ते बोलत असताना, दामिनी पथकातील दोघे पोलीस कर्मचारी तेथे आले. त्यांनी युवक व युवतीला हटकले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे हिसकले आणि बदनामी करण्याची धमकी दिली; परंतु घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळाली. त्यामुळे हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी सहा हजार परत केले आणि घटनेची कुठे वाच्यता न करण्यास बजावले; परंतु याप्रकरणी पोलिसांनी युवक, युवतीचे जबाब नोंदविले आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविला आला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी प्रेमी युगुलाला लुटल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, गुरुवारी उशिरा रात्री सागर सिरसाट, शैलेश पाचपोर या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

Web Title: Police looted Ugulaya lover of Damini Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.