बदल्या केलेले पोलीस कर्मचारी मूळ पोलीस ठाण्यातच!
By admin | Published: July 17, 2017 03:09 AM2017-07-17T03:09:52+5:302017-07-17T03:09:52+5:30
पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनाही तत्काळ सोडण्याचे आदेश शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रमजान ईद उत्सव सण संपल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करीत त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली केली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते; परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुन्हे तपासाची कामे असल्यामुळे संबंधित ठाणेदारांनी या कर्मचाऱ्यांना मूळ ठाण्यातूनच कार्यमुक्त केले नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गुन्हे तपास, बंदोबस्त करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी जाण्याची इच्छा असतानाही ठाणेदार त्यांना सोडत नसल्यामुळे त्यांना मूळ पोलीस ठाण्यातच काम करावे लागत आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस ठाण्यातून मुक्त केले का, याबाबत आढावा नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात येत आहे; परंतु काही पोलीस ठाण्यांमधील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार सोडत नसल्याची ओरड अनेक कर्मचारी करीत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांना लगेच कार्यमुक्त करून बदली केलेल्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते. गुन्हे आढावा बैठकीतसुद्धा ठाणेदारांना बदलीवरील कर्मचाऱ्यांना सोडण्यास बजावले. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करू.
- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.