पातूर तालुक्यात पोलीस पाटलांची पदे रिक्त, पोलिसांचा ताण वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:21+5:302021-09-03T04:20:21+5:30
पातूर : पोलीस आणि महसूल प्रशासनाचा गावपातळीवरील महत्त्वाचा दुवा असलेली पोलीस पाटील ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ८८ ...
पातूर : पोलीस आणि महसूल प्रशासनाचा गावपातळीवरील महत्त्वाचा दुवा असलेली पोलीस पाटील ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ८८ गावांचा कारभार २१ पोलीस पाटलांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे.
पोलीस पाटील हे पद छत्रपती शिवरायांच्या काळापासून कायम आहे. पोलीस प्रशासन महसूल आणि विविध शासकीय यंत्रणांना मदतगार असणारे हे पद गाव पातळीवर आजही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. मात्र पातूर तालुक्यात ८८ गावांची संख्या आहे. त्यामध्ये पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ४४ गावांसाठी २८ पदे मंजूर आहेत. यातील १० पदे रिक्त आहेत. चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत ४४ गावांसाठी २८ पदे मंजूर आहेत. १५ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या २१ गावांच्या पोलीस पाटलांना ३५ ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे पोलीस विभागाचा ताण अधिकच वाढला आहे. गावपातळीवर अवैध धंद्यांना गावागावात ऊत आला आहे. त्याबरोबरच गुन्हेगारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी
सण-उत्सव शेतकऱ्यांच्या धुऱ्याचे, गावकऱ्यांचे मालमत्तांची भांडणे, गावच्या हद्दीत गुन्हा घडून नये, असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढू नये हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेणे कायदा-सुव्यवस्था याचे पालन करणे, गाव पातळीवर विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती देणे, गावपातळीवर अवैध धंद्यांना प्रतिबंध घालून, गौण खनिज याची चोरी थांबविणे यासह पोलीस प्रशासन महसूल आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या कामाची अंमलबजावणी करणे आदी विविध प्रकारची कामे पोलीस पाटलांना करावी लागतात. त्यांना पोलिसांचा तिसरा डोळासुद्धा म्हटले जाते.
तंटामुक्ती समित्या नावालाच
पोलीस पाटलांच्या सोबतच शासनाने तंटामुक्ती समिती निर्माण केली होती. मात्र त्या समित्यांचा कोणत्या स्तरावर आढावा घेतला जात नसल्यामुळे या यंत्रणेचा फायदा आहे शासन व्यवस्थेला होत नाही. जिल्ह्यात दिवसाढवळ्या दरोडे चोऱ्या घडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलीस पाटील या पदाच्या रिक्त ठिकाणी नेमणुका करणे महत्त्वपूर्ण झाले आहे.
पातूर तालुक्यातील बहुतांश गावचे पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत पोलीस पाटलांवर कमालीचा ताण वाढला आहे. शासनाने तातडीने रिक्त जागांवर पोलीस पाटलांची तातडीने नियुक्ती करावी.
-राजूभाऊ बाबाराव देशमुख, तालुकाध्यक्ष पोलीस पाटील संघटना, पातूर