गणेशोत्सव मंडळांना पोलीस परवानगी आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:23 PM2018-09-03T16:23:58+5:302018-09-03T16:26:21+5:30
अकोला : श्री गणेश उत्सवाला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून, या उत्सवात सर्वात महत्त्वाची असलेल्या पोलिसांच्या परवानगीसाठी आता हेलपाटे वाचणार असून, ही परवानगी आॅनलाइन प्रक्रियेद्वारे मिळणार आहे.
अकोला : श्री गणेश उत्सवाला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून, या उत्सवात सर्वात महत्त्वाची असलेल्या पोलिसांच्या परवानगीसाठी आता हेलपाटे वाचणार असून, ही परवानगी आॅनलाइन प्रक्रियेद्वारे मिळणार आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गणेश मंडळांना विविध यंत्रणेच्या परवानग्या घ्यावा लागतात.
माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने नागरिकांनी मोबाइल व इंटरनेट वापर करताना नागरिकांच्या सोयीसाठी सिटिझन पोर्टल ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आॅनलाइन तक्रार देणे, प्रथम खबर पाहणे, हरविलेल्या व्यक्तीची माहिती इत्यादी अनेक माहिती नागरिकांसाठी सिटिझन पोर्टलमध्ये उपलब्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून यामध्ये गणेश मंडळांच्या सदस्यांच्या सोयीकरिता गणेशोत्सव परवागनी अर्ज आता आॅनलाइन करण्यात आला आहे. गणेश मंडळांच्या सदस्यांनी या संकेतस्थळावर आपले युझरनेम आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर ते आपल्या खात्यामधून गणेशोत्सव पोलीस परवानगीकरिता अर्ज करून शकतील. अर्जाची एक प्रत व इतर परवानगी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी लागणार आहे. त्यांना परवानगी मिळाल्याचा संदेश मोबाइलवर मिळणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.
महापालिकेची एक खिडकी योजना!
शासन निर्णयानुसार, महापालिका प्रशासन गणेश भक्तांसाठी महापालिकेमध्ये एक खिडकी कार्यान्वित करणार आहे. या खिडकी योजनेच्या माध्यमातून गणेशभक्त व गणेश मंडळांना विविध परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सोमवारी खाते प्रमुखांची बैठक घेण्यात येऊन सूचना देण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहे. सिटिझन पोर्टल हे नागरिकांना एका क्लिकवर माहिती देण्याचे साधन आहे. त्यामुळे याच पोर्टलवर गणेश मंडळांसाठी यंदा प्रथमच पोलीस दलाने पोलीस परवानगी अर्ज आॅनलाइन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेशभक्त तथा गणेश मंडळांसाठी ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.