पोलीस कर्मचारी निलंबित; ठाणेदाराचीही चौकशी
By admin | Published: September 24, 2015 01:41 AM2015-09-24T01:41:15+5:302015-09-24T01:41:15+5:30
महिलेस १५ हजारांची लाच मागितल्याचे प्रकरण भोवले.
अकोला - विनयभंगाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी संजय लांडे याला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुधवारी तडकाफडकी निलंबित केले. लाचेची रक्कम ठाणेदारांना द्यावी लागणार असल्याचे लांडे याच्या बयाणातून समोर आल्यानंतर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ठाणेदार प्रकाश निघोंट यांचीही बुधवारी तब्बल ३ तास चौकशी केली. बाश्रीटाकळी येथील रहिवासी असलेल्या एका महिलेची छेडखानी झाल्यानंतर महिलेने या प्रकरणाची तक्रार बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात केली. सदर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी संजय लांडे याने त्यांना सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामधील ५ हजार रुपयांची लाच लांडे याने डाबकी रोडवरून स्वीकारून उर्वरित १0 हजार रुपयांची लाच ६ सप्टेंबर रोजी ठाण्यात आणण्याचे सांगितले होते. महिलेने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने संजय लांडे या पोलीस कर्मचार्यास अटक केली. उर्वरित लाचेची रक्कम ठाणेदारांना द्यावी लागणार असल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये समोर आल्यानंतर अकोला एसीबीने ठाणेदार प्रकार निघोंट यांची बुधवारी सायंकाळी तीन तास चौकशी केली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी लाचखोर पोलीस कर्मचारी संजय लांडे याला तडकाफडकी निलंबित केले. प्रकाश निघोंट यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी केली असून, त्यांना या प्रकरणामध्ये दोषी ठरविण्यात येणार आहे किंवा नाही, हे लवकरच समोर येणार आहे.