पोलिसांनी काढली गजराज मारवाडी यांच्या कोतवाल बुकाची नक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:37 AM2017-08-15T01:37:41+5:302017-08-15T01:37:46+5:30
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडप करण्याच्या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गजराज गुदडमल मारवाडी याची कोतवाल बुकाची नक्कल काढली आहे. यामध्ये गजराज गुदडमल मारवाडी, त्यांचे भाऊ, पुतणे व नातू हे सर्वच कुटुंबीय कोणत्याही दस्तावेजावर झांबड हे आडनाव न वापरता मारवाडी असे नाव वापरत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडप करण्याच्या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गजराज गुदडमल मारवाडी याची कोतवाल बुकाची नक्कल काढली आहे. यामध्ये गजराज गुदडमल मारवाडी, त्यांचे भाऊ, पुतणे व नातू हे सर्वच कुटुंबीय कोणत्याही दस्तावेजावर झांबड हे आडनाव न वापरता मारवाडी असे नाव वापरत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेण्यात आल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर या प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत पोलिसांनी गजराज मारवाडी याची कोतवाल बुकाची नक्कल काढली असून, यामध्ये मारवाडी हेच आडनाव वापरले असून, झांबड हे आडनाव कुठेही वापरले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता हा भूखंड हडप करणार्या या बड्या व्यापार्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, लवकरच पोलीस त्याच्याकडे मोर्चा वळविणार असल्याची माहिती आहे.
म्हणे, नोंदणी २00१ मध्येच झाली!
भूमी अभिलेख विभागातील संगणकात गजराज गुदडमल मारवाडी याची मालमत्ता पत्रकाची ऑनलाइन नोंद २00१ मध्येच झाल्याचा साक्षात्कार आता भूमी अभिलेख विभागाला झाला आहे. मात्र, यावर सिटी कोतवाली पोलिसांनी लेखी पत्र देऊन माहिती मागितली असल्याने भूमी अभिलेख विभागाने अद्याप उत्तर दिले नाही. याच विभागाने ही नोंद २0१५ मध्ये झाल्याचे सांगितले आणि आता २00१ मध्ये नोंद केल्याचे सांगण्यात येत असल्याने संब्ििंधत विभागच घुमजाव करीत असल्याचे दिसून येत आहे.
दीपक झांबड यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार!
तोष्णीवाल लेआउटमध्ये असलेल्या वसतिगृहाचा मनपाचा कर अरुण जुमळे व सीमा जुमळे यांनी मनपामध्ये धनादेशाद्वारे भरला आहे. याचा धनादेश क्रमांक व मनपाच्या पावत्या त्यांनी गोळा केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही दीपक झांबड यांनी अरुण जुमळे व सीमा जुमळे या दोघांनी वसतिगृहाचा मनपाचा कर भरला नसल्याची तक्रार करून, तो कर स्वत: भरल्याचे वर्तमानपत्र व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे दीपक झांबड यांनी मानहानी केल्याने त्यांच्याविरोधात अरुण जुमळे हे न्यायालयात मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती जुमळे यांनी लोकमतला दिली.