बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:19 PM2018-09-03T16:19:35+5:302018-09-03T16:19:40+5:30
अकोल्यातील महेश एंटरप्रायजेस यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी हे आरोपी अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे.
अकोला : बनावट कीटकनाशकांची संगनमताने विक्री करणाºया उत्पादक क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनी, नागपूर येथील वितरक गोविंद एंटरप्रायजेस, अकोल्यातील महेश एंटरप्रायजेस यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी हे आरोपी अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे. आरोपींमध्ये बडे मासे असल्याने रामदास पेठ पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्नही होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीने कृषी विभागाकडे त्यांच्याच उत्पादनांच्या नावाने बनावट कीटकनाशकाची कृषी सेवा केंद्राद्वारे विक्री सुरू असल्याची तक्रार केली होती. अकोला शहरातील महेश एंटरप्रायजेसमधून कंपनीच्या बनावट उत्पादनांची ठोकमध्ये विक्री सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद होते. त्यानुसार मिसाइल व बाव्हिस्टीन या बनावट उत्पादनांची कृषी विभागाने चौकशी केल्यानंतर बनावट कीटकनाशकांची विक्री सुरू असल्याचा अहवाल रामदास पेठ पोलीस ठाण्यात देण्यात आला. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, मात्र आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. रामदास पेठ पोलिसांकडून या आरोपींना अभय देण्यात येत असल्याची चर्चा कृषी विभागात सुरु आहे. महेश एंटरप्रायजेससह नागपुरातील गोविंद एंटरप्रायजेसच्या संचालकांना बेड्या ठोकण्यासाठी रामदास पेठ पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याने या आरोपींनी आता अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केली आहे.
कृषी विभागाची भूमिका संशयास्पद
बनावट कीटकनाशक तयार करून विक्री सुरू असल्याची तक्रार सर्वात आधी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीनेच केली होती. एवढेच नव्हे तर कृषी विभागाने कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच क्रमांकातील साठ्यातून घेतलेले नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीला पाठविले असता ते प्रमाणित आढळून आले. मात्र, त्यानंतरही कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कंपनीलाच आरोपी केले आहे. यावरून या प्रकरणात कृषी विभागाची भूमिकाही संशयास्पद असून, हे प्रकरण गुंतागुंतीचे करून शेतकºयांची फसवणूक करणाºयांना कृषी विभाग पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या कृषी सेवा केंद्राद्वारेही विकले कीटकनाशक
कीटकनाशकाचे उत्पादन क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने केल्यानंतर नागपुरातील गोविंद एंटरप्रायजेस, महेश एंटरप्रायजेस यांनी बोगस कीटकनाशक अकोल्यासह यवतमाळ, वाशिम व पुसदमधील काही कृषी सेवा केंद्राद्वारे विक्री केला आहे. यामध्ये अकोल्यातील न्यू बजरंग कृषी सेवा केंद्र, आनंद ट्रेडर्स बार्शीटाकळी, संजय कृषी सेवा केंद्र, किसान कृषी सेवा केंद्र, शीतल कृषी सेवा केंद्र बार्शीटाकळी, शिल्पा कृषी भांडार हातगाव यांचा समावेश आहे.