पोलिसांच्या लवकरच बदल्या; यादी मागविली!
By admin | Published: April 7, 2017 12:52 AM2017-04-07T00:52:18+5:302017-04-07T00:52:18+5:30
अकोला- पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार पसंतीची तीन ठिकाणे
अकोला : पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस ठाण्यांमध्ये पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल.
पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५ नुसार बदल्या करण्यात येणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना एका पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीच्या तारखेपासून ३१ मे २०१७ पर्यंत पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा विशेष शाखा येथे तीन वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या स्वग्राम असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी नेमणूक, बदली करण्यात येणार नाही. पोलीस मुख्यालयात काम करीत असलेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू राहणार नाही. यासोबतच एका पोलीस स्टेशनमधील खंडित, अखंडित सेवा धरून पाच वर्षे पूर्ण झालेल्या आणि एका तालुक्यात खंडित, अखंडित दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बदली प्रक्रिया राबविताना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पसंतीच्या ठिकाणी बदली मागण्याचा अधिकार राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बदलीपात्र पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बदलीसाठी विनंती अर्जासोबत सहपत्र ब नमुन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १० एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदलीसाठी पोलिसांना पसंतीची तीन ठिकाणे द्यावी लागणार आहेत. बदलीसंदर्भात गैरवर्तन केल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे.