...अखेर बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:23 PM2020-03-07T16:23:22+5:302020-03-07T19:56:12+5:30
ही मुलगी नेमकी कुठे होती यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आता बालकल्याण समितीसमोर उघड होणार असल्याची माहिती आहे.
अकोला : सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी प्पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली, तर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व सहायक महिला पोलीस निरीक्षक यांना निलंबित केल्यानंतर या प्रकरणाचा तपास गतीने केल्यानंतर सहा महिने उलटल्यावर स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणातील बेपत्ता मुलीस ताब्यात घेतले आहे. ही मुलगी नेमकी कुठे होती यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आता बालकल्याण समितीसमोर उघड होणार असल्याची माहिती आहे.
सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात तीच्या वडीलांनी केली होती. मात्र पोलिसांनी तपासात हलगर्जी करीत मुलीच्या वडीलांना सापत्न वागणुक दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी त्यांच्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा शोध घेण्यात पोलीस हलगर्जी करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
यावर नागपूर खंडपीठाने पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता; मात्र पोलीस अधीक्षक हजर न होता, त्यांचे प्रतिनिधी हजर राहिले होते. त्यानंतर तक्रारकर्ता पालक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या बदलीची घोषणा केली. तर दोन तपास अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांच्या तपासाची गती वाढली असता स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी व बुधवारी काही संशयित युवकांची चौकशी केली. त्यानंतर शनिवारी या बेपत्ता मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले असून तीला अकोल्यात आणण्यात आले आहे. या मुलीची पुढील चौकशी आणि बयाण बालकल्याण समितीसमोर नोंदविण्यात येणार आहे.