‘सर्वोपचार’मधील दलाल पोलिसांच्या ताब्यात!
By admin | Published: February 24, 2016 01:55 AM2016-02-24T01:55:17+5:302016-02-24T01:55:17+5:30
रुग्णांची आर्थिक लूट; अधिष्ठातांनी दिलेल्या पत्रावरून पोलिसांची कारवाई.
अकोला: वैद्यकीय परिपूर्ती व वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भूलथापा देऊन त्यांची आर्थिक लूट करणार्या सर्वोपचार रुग्णालयातील चार दलालांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास बजावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी पोलिसांना दलालांवर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार मंगळवारी दलालांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
सर्वोपचार रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील काही कर्मचार्यांनी दलालांसोबत संगनमत करून टक्केवारीने वैद्यकीय परिपूर्ती, वैद्यकीय प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदाच सुरू केला आहे. सर्वोपचार रुग्णालयात सात ते आठ दलाल सक्रिय आहेत. दलालांनी कार्यालयातील काही बाबूंशी संधान साधून वैद्यकीय परिपूर्ती देयक व वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी आर्थिक लूट करतात. दलालांच्या माध्यमातून सर्वोपचारमध्ये वैद्यकीय परिपूर्ती देयक व वैद्यकीय प्रमाणपत्र दिली जात असल्याची बाब यापूर्वीच समोर आली आहे. काही दलालांनी तर जिल्हा परिषदेतील एका कर्मचार्याचे बनावट प्रमाणपत्र बनविल्याची बाब खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांच्या निदर्शनास आली होती. त्यावर डॉ. गिरी यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्कासुद्धा असल्याचेही समोर आले होते; परंतु त्यानंतरही दलालांवर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कोणतीच कारवाई केली नाही. गत अनेक वर्षांपासून सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात हे दलाल ठाण मांडून आहेत. रुग्णालयात येणार्या गोरगरीब रुग्णांना कमी दरात रक्त मिळवून देतो, अल्प दरात वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया करावयास सांगतो, अशा भूलथापा देऊन त्यांच्याकडून १00, २00 रुपये उकळतात. हा प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना वारंवार पत्र देऊन दलालांवर कारवाई करण्यास सुचविले होते. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारपासून दलालांच्याविरुद्ध मोहीम उघडली; परंतु कारवाईच्या भीतीने सोमवारी दलाल पळून गेले. मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी यावलीकर यांनी सर्वोपचार रुग्णालयात दलालांची शोध मोहीम राबवून चार दलालांना ताब्यात घेतले. यात आनंद तुलाराम शर्मा (३६), संजय चिंतामण सिरसाट (५0), राजेंद्र नारायणराव मेटकर (५0) आणि दीपक वामनराव खाडे (५६) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
दलालांनी बनविले बनावट शिक्के
फिटनेसचे प्रमाणपत्र, वैद्यकीय परिपूर्ती देयक आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी लागणारे शिक्के काही दलालांनी बनविले आहेत. या शिक्क्यांच्या माध्यमातून ते गरजवंताला प्रमाणपत्र उपलब्ध करून देतात. बनावट सही व शिक्क्याचे प्रमाणपत्र खुद्द जिल्हा शल्य चिकित्सकांनीच पकडले होते. त्यामुळे या ठिकाणी बनावट प्रमाणपत्रे देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे स्पष्ट होते.
अशी उपलब्ध केली जातात प्रमाणपत्रे
फिटनेसचे प्रमाणपत्र, वैद्यकीय परिपूर्ती देयक आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ही जिल्हा शल्य चिकित्सकांची आहे. नोकरदार व त्यांच्या नातेवाईक, कुटुंबीयांना मिळणार्या औषधोपचाराचा खर्च म्हणून वैद्यकीय परिपूर्ती देयक शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत दिल्या जातात; परंतु काही कर्मचार्यांच्या सहकार्याने दलाल ४00-५00 रुपये घेऊन प्रमाणपत्र उपलब्ध करून देतात. हे दलाल गरजू रुग्ण व त्याच्या नातेवाइकाला हेरून, त्यांच्याकडून वैद्यकीय परिपूर्ती देयक व वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी पैसे लाटतात आणि स्वत:च सीएस कार्यालयात प्रमाणपत्रांच्या फाइल जमा करतात. या कामासाठी त्यांना सीएस कार्यालयातील कर्मचार्यांची साथ आहे. प्रमाणपत्रांसाठी शासकीय दरानुसार ३ टक्के रक्कम घेण्याचा नियम आहे; मात्र दलाल व कर्मचारी मोठी रक्कम उकळत आहे.