पोलिसाने आॅटोचालकास बेदम बदडले!
By admin | Published: April 15, 2017 01:36 AM2017-04-15T01:36:51+5:302017-04-15T01:36:51+5:30
अकोला: टॉवर चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अॅटोरिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री टॉवर चौकात घडली.
अकोला: टॉवर चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अॅटोरिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री टॉवर चौकात घडली. या घटनेमुळे गर्दी जमल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ज्या पोलिसाने आॅटोचालकास मारहाण केली त्या आॅटोचालकाची तक्रारही न घेता रामदासपेठ पोलिसांनी मारहाण झालेल्या आॅटोचालकासह हा वाद सोडविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
म्हातोडी येथील रहिवासी तथा आॅटोचालक गजानन निरंजन इदोकार हे त्यांचा आॅटो घेऊन जात असताना त्यांना टॉवर चौकात कार्यरत असलेल्या फराज नामक पोलीस कर्मचाऱ्याने अडविले. या दोघांमध्ये प्रवासी वाहतुकीवरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर या दोघांमध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर हामाणारी झाली असतानाच सदर व्यापारी हा वाद सोडविण्यासाठी गेले.
वाद सोडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी आला. पोलिसांनी आणि व्यापाऱ्यांनी या दोघांमधील वाद सोडविला; मात्र त्यानंतर फराज नामक पोलीस कर्मचाऱ्याने आॅटोचालकासह दोन व्यापाऱ्यांविरुद्धही तक्रार दिली.
त्यामूळे पोलिसांनी आॅटोचालक इदोकार, सागर वानखडे आणि हुंडीवाले या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
चौकातच होते कोंडी
शहरातील बहुतांश चौकांमध्ये काही अॅटोरिक्षा चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. टॉवर चौकात नेहमीच अॅटोचालक बेशिस्तपणे कुठेही, कधीही वाहन उभे करतात. अचानक गती कमी करून प्रवासी बसवतात. अशातच काही अॅटोरिक्षा चालक वाहतूक नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक करतात.