पोलीस प्रशिक्षण दीक्षांत सोहळा: ५८१ प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:11 PM2019-06-07T15:11:40+5:302019-06-07T15:11:54+5:30
अकोला : अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ६२ व्या सत्राचा दिशांत संचलन सोहळा गुरुवार, ६ जून रोजी उत्साहात पार पडला.
अकोला : अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ६२ व्या सत्राचा दिशांत संचलन सोहळा गुरुवार, ६ जून रोजी उत्साहात पार पडला. सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी म्हणून अजित सदाशिव डफळ यांचा गौरव करण्यात आला. या सत्रात प्रशिक्षण केंद्रातील ५८१ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायांनी प्रशिक्षण पूर्ण केले.
दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची उपस्थिती होती. सोहळ्याला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी अमोल बोधे व सेकंड इन परेड कमांडर प्रशिक्षणार्थी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वात कवायत संचलन सादर करण्यात आले. यासोबतच पोलीस प्रशिक्षणार्थींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत वाघुंडे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेपासून २५ हजार ३३९ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती यावेळी दिली. सत्र क्रमांक ६२ मध्ये प्रशिक्षणार्थींच्या परीक्षेचा अंतिम निकाल ९६ टक्के लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य नाफडे, राखीव पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार केंद्राचे उपप्राचार्य विजय नाफडे यांनी मानले.