पोलिसांची दिवाळी होणार गोड!
By admin | Published: October 28, 2016 02:51 AM2016-10-28T02:51:51+5:302016-10-28T02:51:51+5:30
पोलीस अधीक्षकांचा पुढाकार घेऊन कर्मचा-यांसाठी नागपूरहून आणली मिठाई.
नितीन गव्हाळे
अकोला, दि. २७-पोलीस कर्मचारी, अधिकार्यांना दसरा, दिवाळी, ईदसारखे आनंदोत्सव कुटुंब, मुलांसोबत साजरेच करता येत नाहीत. दिवाळी साजरी करायला मिळो अथवा न मिळो; परंतु यंदाच्या दिवाळी उत्सवामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचे तोंड मात्र गोड होणार आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस कर्मचारी, अधिकार्यांना स्पेशल दिवाळी भेट देण्यासाठी नागपूरहून नामांकित कंपनीची मिठाई बोलाविली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात येत आहे. पोलीस दलामध्ये मिठाई वाटपाचा उपक्रम प्रथमच राबविला जात असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
सातत्याने बंदोबस्त, गुन्हय़ांचा तपास, राजकीय नेत्यांचे दौरे यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व्यस्त असतात. राबराब राबूनही त्यांचे कोणी कौतुक करीत नाही किंवा शुभेच्छा देत नाहीत. कुणाकडून कशाचीही अपेक्षा न करता, पोलीस सातत्याने शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झटत असतात. बर्याचदा पोलिसांच्या बोलण्यातून नाराजीसुद्धा व्यक्त होते. तुम्हा सर्वांना दसरा, दिवाळी, ईदसारखे सण साजरे करायला मिळतात; परंतु आमच्या नशिबी ते सुद्धा नाही. दिवाळी, दसर्याच्या दिवशीही बंदोबस्तावर तैनात राहावे लागते. पोलीस ठाण्यात कार्यरत राहावे लागते. इच्छा असूनही कुटुंबीय, मुलांसमवेत दिवाळी उत्सव साजरा करता येत नाही, याची जाणीव खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनासुद्धा आहे. आपल्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना दिवाळी साजरी करता येत नसली, तरी यंदाच्या दिवाळीत त्यांचे तोंड गोड करावे आणि त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्वत:हून पुढाकार घेत, नागपूर येथील एका नामांकित कंपनीकडून शुद्ध तुपातल्या मिठाईचे बॉक्स बोलाविले आहेत. पोलीस कर्मचारी, अधिकार्यांना या मिठाई बॉक्सचे पोलीस मुख्यालयातून वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाची पोलीस दलात चांगलीच चर्चा आहे.
२७00 पोलिसांना मिठाईचे वितरण
पोलीस दलामध्ये जिल्हा व शहरात २७00 संख्याबळ आहे. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांंना दिवाळी उत्सवादरम्यान मिठाईचे वितरण करण्यात येत आहे. पोलीस मुख्यालयामध्ये जाऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी आपली मिठाईची भेट घेऊन जात आहेत.
पोलिसांचा दिवाळी मेळावा घेण्याची प्रथा होती; परंतु त्यात खंड पडला. आमचे अधिकारी, कर्मचारी वर्षभर परिश्रम करतात. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. या दृष्टिकोनातून यंदाच्या दिवाळीत त्यांना मिठाई भेट देण्यात येत आहे.
-चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक.