पालकमंत्र्याच्या धाड सत्रानंतर पातुर येथील एक पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 10:43 AM2021-06-23T10:43:46+5:302021-06-23T10:43:56+5:30
A policeman from Patur has been suspended : प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पातूर येथील एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचा आदेश दिला.
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी वेषांतर करून गुटखा विक्री करणाऱ्यांकडून गुटखा खरेदी केला. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची दिरंगाई असल्याने प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पातूर येथील एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचा आदेश दिला, तर जुने शहर पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांची शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पालकमंत्री कडू यांनी सोमवारी गुटखा विक्री करणाऱ्या काही दुकानांवर स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रवर तसेच बँकांमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये अनेकांची दिरंगाई व कामात कुचराई असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी दिले. यावरून अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा प्रभारी पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पातूर येथील इंगळे नामक कर्मचाऱ्यास निलंबित केले तर जुने शहर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्याकडे दिली आहे. शहर पोलिस उपअधीक्षक यांनी या चौकशीस प्रारंभ केला आहे. चौकशी अहवाल सादर केल्यानंतर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.