पोलीस कर्मचा-याने महाराजांवर रोखली पिस्तुल
By admin | Published: January 28, 2015 12:15 AM2015-01-28T00:15:05+5:302015-01-28T00:15:05+5:30
म्हणे, १५ वा अध्याय म्हण; गुन्हा दाखल; खामगाव-नांदुरा मार्गावरील घटना.
जलंब (बुलडाणा): वाराणसी येथील महाराजांना अडवून त्यांच्यावर पिस्तुल रोखून, ह्य१५ वा अध्याय म्हण, नाहीतर गोळी घालतोह्ण, अशी धमकी देणे पोलीस कर्मचार्याच्या अंगलट आले आहे. ही घटना २६ जानेवारीच्या रात्री १ वाजता खामगाव-नांदुरा दरम्यान चिखली आमसरी फाट्यानजीक घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचार्यास अटक केली आहे. धमकी देणारा पोलीस कर्मचारी हा खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांचा अंगरक्षक आहे.
वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी (वय ६३) नाशिक येथून कारंजाकडे मारुती कारने जात होते. नांदुरा ते खामगाव दरम्यान चिखली फाट्यानजीक त्यांची गाडी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांना पेट्रोलिंगवर असलेल्या जलंब पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एका ढाब्यावर आणून सोडले व निघून गेले. त्यानंतर बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विष्णू काटोले (वय ३१,. रा. अटाळी) हा तेथे आला. त्याने शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी महाराज यांची चौकशी सुरू केली. त्याने महाराजांना गीतेचा १५ वा अध्याय म्हणावयास सांगितले. शंकरानंद यांनी त्यास नकार दिल्याने काटोलेने शंकरानंद आणि त्यांच्या वाहनाच्या चालकावर पिस्तुल रोखत त्यांना गोळी घालण्याची धमकी दिली; तसेच त्याने लोटपाट करून अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी यांनी जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी पोलीस कर्मचारी विष्णू काटोलेविरुद्ध भादंविचे कलम ३0७, २९४, ५0६ तसेच आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जी.श्रीधर करीत आहेत.