पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:45+5:302021-04-27T04:18:45+5:30
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला : २५७७ जणांनी घेतली लस अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला : २५७७ जणांनी घेतली लस
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, जिल्हा सीमेवर वाहन तपासणी यासह विविध कामांचा ताण पुन्हा वाढल्याने पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या, असा सूरही उमटत आहे. आरोग्याची काळजी घ्या, लवकर घरी या, अशी आर्त हाकही कुटुंबातील सदस्य देत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीची नवीन नियमावली लागू झाली असून, अंमलबजावणीसाठी पोलीस पुन्हा तैनात झाले आहेत. जिल्ह्यात तीन हजारांवर पोलीस कर्मचारी असून, जिल्हाबंदी नियमाची अंमलबजावणी म्हणून जिल्हा सीमेवर ३९ ठिकाणी नाकाबंदी तसेच ६५ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरातील प्रमुख चौक, प्रमुख मार्ग यासह प्रतिबंधित क्षेत्र व ग्रामीण भाग अशा सर्वच ठिकाणी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. कोरोनाकाळात चोख कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनादेखील कोरोना संसर्ग होत आहे. आतापर्यंत जवळपास १९० जणांना कोेरोना संसर्ग झाला असून, एकाचा मृत्यूही झाला. कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना इतरांपासून आपल्याला कोरोना संसर्ग होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे, तसेच शासनानेदेखील आवश्यक ती किट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित आहे.
००
बाबा, लवकर या, आम्ही घरी वाट पाहतोय... !
कोरोना विषाणू संसर्ग असल्याने प्रत्येकजण काळजी घेऊन जास्तीत जास्त वेळ घरातच राहत आहे. पप्पा ड्युटीवरून घरी परत कधी येतात याची वाट बघत असतो.
प्रज्वल विष्णू ढोरे
००००
कोरोनामुळे इतरांचे बाबा ऑफिस आटोपून लवकर घरी येतात. आमच्या पप्पाला मात्र दिवसभर रस्त्यावरच ड्युटी करावी लागते. पप्पा घरी कधी येतात, याची वाट आम्ही बघत असतो.
पायल चंद्रकांत काटोले
कोरोना विषाणू संसर्ग होणार नाही, याची दक्षता पप्पांकडून घेतली जाते. आरोग्याची काळजी घ्या, असे आम्हीही त्यांना सांगत असतो. घरी लवकर या, असा हट्टही त्यांच्याकडे धरत असतो.
अंशुमन नितीन चव्हाण
कोरोनाकाळातही पप्पा दिवसभर ड्युटी करीत असल्याने थोडीही चिंताही असते. आम्ही सर्व वाट बघत आहोत, तुम्ही लवकर घरी या असे फोन करून त्यांना सांगत असतो.
ऋतुराज विकास वाघ
लसीकरण...
एकूण पोलीस नोंदणी २९९०
पहिला डोस घेणारे २५७७
दुसरा डोस घेणारे १८२४
एकही डोस न घेणारे ४१३
०००००
१९० पोलीस पॉझिटिव्ह
एकूण कोरोनाबाधित पोलीस १९०
सध्या उपचार सुरू असलेले पोलीस २६
एकूण कोरोनाबाधित पोलीस अधिकारी १५
सध्या उपचार सुरू असलेले पोलीस अधिकारी २
मृत्यू ०१