पोळा फुटला; पक्षांतराचा अन् आंदोलनाचा!
By admin | Published: January 10, 2017 02:35 AM2017-01-10T02:35:58+5:302017-01-10T02:35:58+5:30
शिवसेनेने केली भाजपाची परतफेड; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने उपसले आंदोलनाचे हत्यार!
अकोला, दि. ९-महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या पृष्ठभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर करणार्यांना प्रवेश देण्याचा प्रकार सुरु झाला आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवण्यासाठी विविध मुद्यांवर आंदोलनाचा सपाटा सुरु झाला आहे. रविवारी सेनेच्या नगरसेविका योगिता पावसाळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सोमवारी शिवसेनेने भाजपाच्या नगरसेविका नम्रता मोहोड यांना सन्मानाने प्रवेश देत भाजपाला तोडीस तोड उत्तर दिले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राजकीय पक्षांचे नाराज नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर करण्याची जणू स्पर्धा रंगल्याचे चित्र समोर येत आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल दहा नगरसेवकांचा प्रवेश करीत राजकीय भूकंप आणला होता. त्यापाठोपाठ भाजपाने राकाँ व शिवसेनेच्या नगरसेविकेला पक्षात खेचल्यानंतर आता शिवसेनेने भाजपाच्या नगरसेविका नम्रता मोहोड यांना पक्षात प्रवेश देऊन प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी नगरसेविका नम्रता मोहोड यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात खांद्यावर शिवसेनेचा धनुष्य उचलला.
महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची कोणतेही चिन्ह तूर्तास दिसत नसल्यामुळे एकमेकांच्या पक्षातील विद्यमान नगरसेवक, आजी-माजी पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत युती किंवा आघाडी होणार असल्याचे बोलल्या गेले. ऐनवेळेवर प्रत्येक पक्षाने सोयीनुसार भूमिका घेत नगरपालिका निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणे पसंत केले. फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. नगरपालिका निवडणुकीचा अनुभव पाहता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नगरसेवकांच्या पक्षांतराचा पोळा फुटण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. सोमवारी प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपाच्या विद्यमान नगरसेविका नम्रता मोहोड यांनी ह्यकमळह्ण बाजूला सारत शिवसेनेचा धनुष्यबाण उचलणे पसंत केले.
आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यालयात नम्रता मोहोड, विजय मोहोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, डॉ. विनीत हिंगणकर, शहर प्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, संतोष अनासने, तरुण बगेरे, नगरसेवक राजेश काळे, राजेश्वरी शर्मा, ज्योत्स्ना चोरे, सुनीता मेटांगे, देवश्री ठाकरे, चंदा तायडे, किशोर ठाकरे, देवीदास बोदडे, तालुकाप्रमुख गजानन मानतकर, धनंजय गावंडे, नरेंद्र गुल्हाने, रमेश गायकवाड, मुन्ना मिश्रा, विजय खिरडकर, राजेश भगत, संजय वाडेकर, संजय काशीद, उमेश मुकिंद, करण चाकोते, बबलू शुक्ला, सतीश मानकर, श्रीकांत पागृत, पप्पू बोचरे, गोलू इंगळे उपस्थित होते.
'क्रिम'प्रभागांच्या वाटणीवरून सेनेत रणकंदन
मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी अकोला पूर्वच्या शहर प्रमुखपदी अतुल पवनीकर तसेच अकोला पश्चिमच्या शहर प्रमुखपदी राजेश मिश्रा यांची नियुक्ती केली. प्रभाग पुनर्रचनेमुळे २0 प्रभाग अस्तित्वात आले. यामध्ये सेनेला पोषक असणार्या प्रभागांच्या वाटणीवरून दोन्ही शहर प्रमुखांमध्ये चांगलीच धुसफूस सुरू आहे. उमेदवारी अर्ज सादर करणार्यांमध्ये अतुल पवनीकर यांच्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांचा सर्वाधिक भरणा असल्याची माहिती आहे. प्रभागांच्या वाटणीवरून धुसफूस सुरु झाली आहे. त्यामुळे भाजपाचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेसमोर तगडे उमेदवार शोधण्याचे आव्हान ठाकल्याची माहिती आहे.
राकाँच्या महिला शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला महानगराध्यक्ष संगीता तायडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्वराज्य भवन येथे काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. यानंतर काँग्रेस आणखी कोणाला अन् कधी धक्का देणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.