राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे डाेहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:16+5:302021-01-15T04:16:16+5:30
फेब्रुवारी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अकाेलेकरांना ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले हाेते. त्या वेळी अकाेलेकरांनी भाजपच्या पदरात स्पष्ट ...
फेब्रुवारी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अकाेलेकरांना ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले हाेते. त्या वेळी अकाेलेकरांनी भाजपच्या पदरात स्पष्ट बहुमताचे दान टाकले हाेते. या पाच वर्षांच्या कालावधीत अद्यापही शहरातील अस्वच्छता, प्रभागांमधील तुंबलेल्या नाल्यांसह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाची समस्या कायम असून सेवाभावी संस्थांनी बळकावलेल्या ‘ओपन स्पेस’मध्ये सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास सर्वसामान्य नागरिकांना मज्जाव केला जात आहे. महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी सुमारे १२ अत्याधुनिक शाैचालयांचा प्रस्ताव मागील सहा वर्षांपासून धूळ खात आहे. दरम्यान, २०२२ मधील निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीने रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मतदार नाेंदणी अभियानाच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात राहण्याचा दाेन्ही राजकीय पक्षांचा प्रयत्न दिसत आहे.
शिवसेना आक्रमक ‘माेड’वर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गठीत हाेताच व मुख्यमंत्री पदाची सूत्रे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यापासून जिल्ह्यासह शहराच्या राजकारणात शिवसेना आक्रमक ‘माेड’वर गेल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे
मनपात प्रमुख विराेधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या गाेटात कमालीची शांतता दिसत आहे. शहरातील उत्तर झाेन वगळता इतर भागात काँग्रेसकडे सक्षम व दमदार कार्यकर्त्यांची फळी नसल्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
मेळाव्यांमधून एकमेकांचा खरपूस समाचार
मनपा निवडणुकीस एक वर्षाचा अवधी असला तरी आत्तापासूनच भाजप व सेनेच्या मेळाव्यांमधून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना हा गुंड व खंडणीखाेरांचा पक्ष असल्याची टीका भाजपच्या मेळाव्यात झाल्यानंतर शहरात गुंठेवारी प्लाॅटची विक्री करणे, आरक्षण हटवून जमिनींची विक्री करणाऱ्या पांढऱ्या कपड्यातील भूखंड माफियांपासून सावध राहण्याचे प्रत्युत्तर सेनेच्या मेळाव्यातून देण्यात आले.