सेनेच्या पक्षबांधणीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 02:07 AM2016-10-14T02:07:03+5:302016-10-14T02:07:03+5:30
मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाची रणनीती बदलल्याने अनेकांची कोंडी झाली.
आशिष गावंडे
अकोला, दि. १३- अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी पक्षाच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल केले. शिवसेनेला आलेली मरगळ दूर करून पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खा. सावंत यांनी अचूक निशाणा साधत एका बाणात अनेक ह्यपक्षांह्णची शिकार केली. त्याचा परिणाम स्वकीयांच्या नाराजीपेक्षा इतर राजकीय पक्षांवर अधिक झाला असून सेनेच्या बदलत्या भूमिकेमुळे कमालीची अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे.
कधीकाळी राज्यातील ग्रामीण भागावर शिवसेनेची मजबूत पकड होती. त्यावेळी शिवसेना मोठय़ा भावाच्या तर भारतीय जनता पार्टी लहान भावाच्या भूमिकेत होते. २0१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राजकीय पक्षांच्या भूमिकेतही बदल झाला.
पुढची वाट सोपी नसल्याचे चित्र व जिल्ह्यासह शहरात शिवसेनेची ढासळलेली तटबंदी मजबूत करावी लागणार, हे लक्षात येताच पक्षश्रेष्ठींनी पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी जिल्ह्यासह शहर कार्यकारिणीत फेरबदल केले. तसेच पक्षात राहायचे असेल तर गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून कामाला लागण्यासाठी आजी-माजी पदाधिकार्यांना कानपिचक्या दिल्या. पक्षातील बदलामुळे स्वकीयांमध्ये काही अंशी नाराजीचा सूर होताच; परंतु त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता इतर राजकीय पक्षांच्या काही सक्रिय पदाधिकार्यांमध्ये पसरल्याचे बोलल्या जात आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत झालेल्या बदलाचे परिणाम इतर राजकीय पक्षांच्या निर्णयप्रक्रियेवर होत असून संबंधित पक्षांनी चांगलाच धसका घेतल्याची चर्चा रंगली आहे. नवनियुक्त जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्ह्याची पुनर्बांंंधणी करण्यासोबतच महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले.
यासाठी त्यांनी सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर यांच्यात प्रत्येकी दहा-दहा प्रभागांची विभागणी करीत जबाबदारी वाटून दिली आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेतील जुन्या जाणत्या अनुभवी आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे आजपर्यंंंंत इच्छा असूनही पक्षात काम न करू शकणारे प्रामाणिक कार्यकर्ते सरसावल्याचे चित्र आहे.
आमदारकीचे स्वप्न भंगले
शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत बदल झाल्याचा सर्वाधिक परिणाम आमदारकीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्या काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांवर झाला आहे. जिल्ह्यात काही ठरावीक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. अशा मतदारसंघातून २0१९ मधील संभाव्य निवडणुकीसाठी अनेकांनी आतापासूनच तयारी सुरू केली होती. अशा इच्छुकांचे आमदारकीचे स्वप्न भंगल्याची खमंग चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
गृहीत धरणार्यांची कोंडी
शिवसेनेची ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ अद्यापही कायम असल्यामुळे जिल्हा परिषद, अकोला पंचायत समितीत सेनेचा प्रभाव आहे. असे असताना जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती असो वा महापालिकेतील राजकीय घडामोडींमध्ये मित्र पक्षांकडून शिवसेनेला परस्पर गृहीत धरले जात होते. आज रोजी पक्षातील बदलामुळे गृहीत धरणार्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.