स्थायी समितीसाठी राजकीय पक्ष सरसावले
By admin | Published: April 14, 2017 01:55 AM2017-04-14T01:55:20+5:302017-04-14T01:55:20+5:30
अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सदस्य निवडीसाठी १५ एप्रिल रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या विशेष सभा; ‘स्थायी’साठी १६ सदस्यांची होणार निवड
अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सदस्य निवडीसाठी १५ एप्रिल रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पृष्ठभूमीवर राजकीय पक्ष सरसावले असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ‘स्थायी’मध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व इतर अपक्ष नगरसेवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मनपाच्या निवडणुकीत भाजपचे ४८ नगरसेवक विजयी झाले असून, अपक्ष नगरसेविका माधुरी मेश्राम यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे तूर्तास चित्र आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ ४९ झाल्याने स्थायी समितीमध्ये भाजपच्या दहा सदस्यांचा समावेश होऊ शकतो. विरोधी पक्ष काँग्रेसचे संख्याबळ १३ असून, संख्याबळानुसार काँग्रेसच्या दोन सदस्यांचा मार्ग खुला आहे. उर्वरित ४ जागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व भारिप-बमसंमध्ये रस्सीखेच रंगली आहे. शिवसेनेचे संख्याबळ आठ असून, प्रभाग ११ मधील अपक्ष नगरसेवक जकाऊल हक (डब्बू सेठ) यांची मदत घेऊन आघाडी स्थापन केल्याने सेनेचे संख्याबळ नऊ झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाच असून, त्यांनी भारिप-बमसंचे तीन तर एमआयएमचे मोहम्मद मुस्तफा यांना सोबत घेत एकूण नऊ सदस्यांची आघाडी गठित केली.
दोन्ही आघाड्यांचे संख्याबळ प्रत्येकी नऊ झाल्याने दोन्ही आघाडीतून प्रत्येकी दोन सदस्यांची स्थायी समितीसाठी वर्णी लागेल. इच्छुक नगरसेवकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे फिल्डिंग लावणे सुरू केले असून, स्थायीसाठी कोणाची निवड होते, हे विशेष सभेत दिसून येईल.
आज शिवसेनेची बैठक
शिवसेनेने अपक्ष नगरसेवक जकाऊल हक यांना सोबत घेतल्यामुळे त्यांच्या आघाडीचे एकूण संख्याबळ नऊ झाले आहे. संख्याबळानुसार सेनेकडून ‘स्थायी’साठी दोन सदस्यांची नावे दिल्या जातील. यासंदर्भात शुक्रवारी आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, गटनेता राजेश मिश्रा यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.
भाजपच्या बैठकीत चर्चा
‘स्थायी’च्या मुद्यावर गुरुवारी पक्ष कार्यालयात भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीला भाजपचे स्थानिक नेते, महापौर उपस्थित होते. स्थायी समितीसह आगामी सभांमध्ये विकास कामांचे प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यावर चर्चा करण्यात आली.