राजकीय पक्षांचा ‘स्थायी’साठी काथ्याकूट!

By admin | Published: April 15, 2017 01:18 AM2017-04-15T01:18:11+5:302017-04-15T01:18:11+5:30

आज भाजप, भारिपची बैठक; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून येणार फॅक्स

Political parties 'standing' for Katichakoot! | राजकीय पक्षांचा ‘स्थायी’साठी काथ्याकूट!

राजकीय पक्षांचा ‘स्थायी’साठी काथ्याकूट!

Next

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीसाठी उद्या (शनिवार) मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्थायी’मध्ये नेमके कोण्या नगरसेवकाला पाठवायचे, या मुद्यावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये शुक्रवारी दिवसभर काथ्याकूट सुरू होते. भाजपने शनिवारी सकाळी नऊ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन केले असून, भारिप-बमसंचा निर्णय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जाहीर करतील. तर काँग्रेस नगरसेवकांच्या नावावर थेट प्रदेश कार्यालयातून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
महापालिकेत स्थायी समितीचे गठन केले जाणार आहे. मनपात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपचे संख्याबळ ४८ असून, त्यांना अपक्ष नगरसेविका माधुरी मेश्राम यांचा पाठिंबा आहे. भाजपचे संख्याबळ लक्षात घेता ‘स्थायी’साठी दहा नगरसेवकांची निवड केली जाईल. काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, यामधून दोन नगरसेवकांची वर्णी लागेल. शिवसेनेने अपक्ष नगरसेवक जकाऊल हक यांना सोबत घेऊन आघाडी स्थापन केल्याने सेनेच्या आघाडीचे संख्याबळ नऊ झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन आघाडी स्थापन केल्याने राकाँचे संख्याबळदेखील नऊ झाले आहे. शिवसेना व राकाँच्या आघाडीचे संख्याबळ समान झाल्याने दोन्ही आघाडीतून प्रत्येकी दोन नगरसेवकांची वर्णी लागेल. आगामी दिवसांत मनपाला मिळणारा निधी पाहता स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी नगरसेवकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत.

यांच्या नावावर पक्षात खलबते!
‘स्थायी’मध्ये पाठवण्यासाठी भाजपमध्ये सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, बाळ टाले, हरीष आलिमचंदानी, अजय शर्मा, मिलिंद राऊत, संतोष शेगोकार, आशीष पवित्रकार, सुजाता अहिर, अनिता शर्मा, संजय बडोणे, विशाल इंगळे, सुनील क्षीरसागर, रंजना विंचनकर तसेच काँग्रेसमध्ये शाहीन अंजूम मेहबूब खान, जैनबबी शे. इब्राहिम, इरफान अब्दुल रहेमान मोहम्मद, चांदनी शिंदे, सुवर्णरेखा जाधव, अ‍ॅड. इक्बाल सिद्दिकी, अजरा नसरीन मकसूद खान यांच्या नावावर खलबते सुरू आहेत. शिवसेनेत राजेश मिश्रा, मंजूषा शेळके, सपना नवले, गजानन चव्हाण तसेच राकाँच्या आघाडीतून उषा विरक, शीतल रामटेके, अ‍ॅड. धनश्री देव किंवा बबलू जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

 

Web Title: Political parties 'standing' for Katichakoot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.