नद्यांचे प्रदूषण; घोटला जलचरांचा श्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:23 PM2019-10-04T14:23:09+5:302019-10-04T14:25:03+5:30
काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नद्यांमध्ये सर्रासपणे सोडले जाणारे सांडपाणी, घाण कचरा, निर्माल्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमालीचे घटते. पर्यावरणातील जैवसाखळीत महत्त्वाचे घटक असलेल्या जलचर प्राण्यांचा श्वास घोटण्याचे काम त्या माध्यमातून मानवाद्वारे होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत.
दरवर्षी ठरावीक काळात नद्यांतील पाणी नमुन्यांचे रासायनिक परीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा या नद्यांतील पाण्याची तपासणी करण्यात आली. या नद्यांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी, गुराढोरांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान या तपासणीच्या निमित्ताने पुढे आले आहे. विशेष काटेपूर्णा, मोर्णा नद्यांचे पाणी पूर्णा नदीत मिसळते. पूर्णा नदीवर नेर-धामणा बॅरेज, पुढे जिगाव प्रकल्प आहे. या प्रकल्पातून पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी मिळणार आहे; मात्र या तीनही नद्यांतील पाणी प्रदूषित असताना त्याचा वापर करणाºया मानवी तसेच इतर सजीवांवरही होणार आहेत. त्याचा फटका मानवासोबतच पर्यावरणीय घटकातील जैवसाखळीलाही बसत आहे. येत्या काळातील पर्यावरणाचा समतोल टिकवायचा असेल, तर नद्यांचे प्रदूषण करणाºया घटकांना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यासाठीच सद्यस्थितीत नद्यांतील पाणी नमुन्यांची तपासणी करून त्याचे निष्कर्ष पुढे आणले जात आहेत. जिल्ह्यातील तीनही नद्यांच्या नमुन्यांची तपासणी सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आली. त्या निष्कर्षात पाण्यातील घटकांचे प्रमाण चिंताजनक आहे.
तीन ठिकाणी घेतले पाणी नमुने
पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन नद्यांतील ठरावीक ठिकाणी नमुने घेतले आहेत. त्यामध्ये मोर्णा नदीत अकोला शहरातील गणेश घाट, काटेपूर्णा नदी- कुरणखेड, तर पूर्णा नदीचे गांधीग्राम येथे नमुने घेण्यात आले. विशेष सण-उत्सवाच्या काळापूर्वी, उत्सव सुरू असताना आणि उत्सवाच्या समारोपानंतर नमुने घेत त्यांची तपासणी करण्यात आली.
पाण्याचा सामू, आॅक्सिजनमध्ये तफावत
पाणी पिण्यायोग्य, उद्योग, जलचरांसाठी, वापरासाठी असताना त्यामध्ये आवश्यक असलेला सामू (पीएच) तसेच आॅक्सिजनचे प्रमाण ठरले आहे. कमी किंवा अधिक असल्यास पाण्याची गुणवत्ता बाधित होते. त्या नमुन्यांमध्ये सामूचे प्रमाण ६ ते ८ पेक्षा कमी-अधिक असणे, आॅक्सिजनचे प्रमाण मोर्णा नदीत तर कमालीचे अल्प आहे. या ठिकाणी प्रतिलीटर १.५२ मिलीग्रॅम एवढे कमी ते आहे. .