पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, केवळ २० टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:33+5:302021-07-20T04:14:33+5:30
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - ०२ एकूण प्रवेश क्षमता - ५४० आतापर्यंत केलेले अर्ज - ३२३ अर्ज भरण्याची अखेरची मुदत- २३ ...
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - ०२
एकूण प्रवेश क्षमता - ५४०
आतापर्यंत केलेले अर्ज - ३२३
अर्ज भरण्याची अखेरची मुदत- २३ जुलै
दहावी निकालानंतर येणार गती
पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू करण्यात आली. परंतु, इयत्ता दहावीचा निकाल लागायचा असल्याने, बैठक क्रमांक नसल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज कमी झाले. आता १६ जुलै रोजी दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर पाॅलिटेक्निकच्या प्रवेशाला गती मिळण्याची शक्यता आहे. दहावीच्या निकालानंतर मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थी करिअर निवडतात. त्यामुळे टक्केवारीनुसार विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळतात. त्यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशाला काही दिवसांत गती येण्याची शक्यता आहे. २३ जुलै ही ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
गेल्यावर्षी १० टक्के जागा रिक्त
यंदा दहावीची परीक्षा रद्द झाली. निकालही उशिरा लागला. दहावीचा निकाल न लागताच तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली. प्रवेश अर्ज करताना, विद्यार्थ्यांना मार्कशिट, बैठक क्रमांक द्यावा लागतो. परंतु निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेश अर्जच केले नाहीत. गतवर्षी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्ज केले होते. तरीही १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश अर्ज प्रक्रियेला गती मिळणार आहे. गत दोन-तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे. यंदाही पॉलिटेक्निक कॉलेजमधील सर्व जागा भरण्याची अपेक्षा आहे. २३ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने, विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेशासाठी अर्ज करावेत.
-डॉ. अरुण गुल्हाने, प्राचार्य
शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर
दहावीचा निकाल लागायचा होता. गुणपत्रिका, टक्केवारी माहिती नसल्याशिवाय अर्ज कसा करावा. शिवाय बैठक क्रमांकही नव्हता. त्यामुळे पॉलिटेक्निकच काय, अन्य ठिकाणी प्रवेश घेण्याचा प्रश्नच नव्हता. आता दहावीचा निकाल लागला आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे असल्याने, त्यादृष्टीने पुढील प्रवेश घेणार आहे.
-प्रियांशु लक्ष्मण शिरसाट, विद्यार्थी
दहावीचा निकाल लागल्याशिवाय पुढील दिशा ठरविता येत नव्हती. निकाल, गुणपत्रिकेशिवाय कोणत्या क्षेत्राकडे जायचे हे ठरविले नव्हते. आता निकाल लागला आहे. गुणही चांगले मिळाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र निवडण्याचे ठरविले आहे.
-ईशा नारायण पवार, विद्यार्थिनी