खेट्री परिसरातील शेत रस्त्यांची दयनीय अवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:46+5:302021-08-01T04:18:46+5:30
नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न कायम असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतात ये-जा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ...
नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न कायम असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतात ये-जा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पातूर तालुक्यातील खेट्री, पिंपळखुटा, चान्नी, चतारी, शिरपूर, सायवनी आदी शिवारातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतात खताचे पोते ने-आण करणे आदी कामाकरिता शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा शेत रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते ; मात्र परिसरात शेत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
--------------------------
शेत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच खेट्री परिसरात शेत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेत रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. शेत रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात कामासाठी जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------------------
शेत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने बैलजोडी, ट्रॅक्टर नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या शेती मशागतीची कामांना वेग आला असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेत रस्त्याचे खडीकरण करावे.
-नाजुराव देशमुख शेतकरी. पिंपळखुटा
----------------------
शेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चिखल तुडवत शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागते. शेतात बैलगाडी, कुठल्याच प्रकारची वाहने जाऊ शकत नसल्याने खते, शेतमाल डोक्यावर घरी आणावा लागतो.
-मो. आसिम, शेतकरी शिरपूर.