गाडेगाव-तेल्हारा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:15 AM2021-07-15T04:15:06+5:302021-07-15T04:15:06+5:30
तेल्हारा : तालुक्यातील गाडेगाव-तेल्हारा रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यात मोठमोठे खड्डे, नाल्या पडल्याने रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता ...
तेल्हारा : तालुक्यातील गाडेगाव-तेल्हारा रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यात मोठमोठे खड्डे, नाल्या पडल्याने रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता हे कळेनासे झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून होत आहे.
गाडेगाव-तेल्हारा रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गाडेगाव येथील नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी तेल्हारा येथे यावे लागते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. रात्रीच्या सुमारास प्रवास धोकादायक असल्यानंतरही नागरिकांना प्रवास करावा लागतो. अनेक वेळा सदर रस्त्याच्या कामासाठी तोंडी तक्रारी करण्यात आल्या; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (फोटो)
-----------------------
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गाडेगाव-तेल्हारा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येत असून, अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात वाढले आहेत. असे असतानाही लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
-----------------------
पाच मिनिटाच्या प्रवासाला अर्धा तास!
गाडेगावकराना कामानिमित्त तेल्हाऱ्यात यावे लागते. तसेच दररोज शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याच रस्त्याने नाईलाजास्तव प्रवास करण्याची वेळ संबंधित प्रशासनाने आणली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे पाच मिनिटात होणाऱ्या प्रवासाला अर्धा तास लागत असून, अपघाताची भीती आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
---------------------------
गाडेगाव-तेल्हारा रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गती द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
-गोकुळ हिंगणकर, भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष, अकोला.