हातरूण-गांधीग्राम रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:09+5:302021-04-19T04:17:09+5:30
हातरूण : हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे ...
हातरूण : हातरुण-गांधीग्राम रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हातरुण परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.
हातरुण, दुधाळा, बोरगाव वैराळेमार्गे गांधीग्राम रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून, हा रस्ता अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालविताना वाहनचालकास कसरत करावी लागत आहे. गांधीग्राम परिसरातील ग्रामस्थांना शेगावकडे जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा व सोयीचा असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. हातरुण परिसरातील ग्रामस्थांना अकोट, चोहट्टा बाजार, दर्यापूर ये-जा करण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. सद्य:स्थितीत या मार्गाची चाळणी झाली असून, रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली असून, नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे वाहनचालक आणि नागरिक वैतागले आहेत. या रस्त्याने विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. रस्ता उखडल्याने नागरिक त्रस्त झाले असून, या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गांधीग्राम ते हातरूण रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामकुमार गव्हाणकर, हातरुण सरपंच वाजिद खान, गांधीग्राम माजी सरपंच संजय माजरे, राजेश काळे, अमित काळे, ओम वेते, संतोष गव्हाळे, साजिद शाह यांनी केली आहे. (फोटो)