हिरपूर-आसरा रस्त्याची दयनीय अवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:13+5:302021-01-08T04:58:13+5:30
मूर्तिजापूर: हिरपूर-ब्रह्मी-आसरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ...
मूर्तिजापूर: हिरपूर-ब्रह्मी-आसरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास हिरपूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
अमरावती, अकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या हिरपूरमार्गे-ब्रह्मी-आसरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालकांना हाडाचे व मणक्याचे आजाराने ग्रासले आहे. तसेच अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे; लोकप्रतिनिधी उदासीन असल्यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहे. रस्त्याची चाळणी झाले असल्याने हिरपूरवासीयांना नाईलाजास्तव लांब अंतराच्या व जोखमीच्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे राष्ट्रशक्ती हम चालीस संघटनेने निवेदन देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास हिरपूर येथील उड्डाणपुलावर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देताना हम चालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव, तालुकाध्यक्ष रोहित सोळंके, किशोर सोनोने, विजय राऊत, मोहम्मद शहाबुद्दीन यांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रति केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना पाठविण्यात आल्या आहेत. (फोटो)