वाडेगाव येथील आंतरराष्ट्रीय शाळेची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:57+5:302021-08-24T04:23:57+5:30
राहुल सोनोने दिग्रस बु: पातूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था ...
राहुल सोनोने
दिग्रस बु: पातूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाल्याने परिणामी, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पटांगणात बसावे लागत असल्याचे चित्र आहे. शाळेमध्ये एकूण एक ते आठ वर्ग आहेत. पातूर तालुक्यातील एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाची व शासनाने सन २०२१-२२ मध्ये घोषित केलेल्या आदर्श शाळेला एकूण सहा वर्ग खोल्या नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत परिसरातील तुलंगा बु, तुलंगा खुर्द, दिग्रस खुर्द, तांदळी, सस्ती या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शाळेचा शैक्षणिक दर्जा व प्रगती, उत्तम असल्याने मुलांची वाढती पटसंख्या पाहून या ठिकणी एकूण सहा वर्गखोल्यांची कमतरता आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत आहे. या ठिकाणी फक्त चार वर्गखोल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
---------------------
वर्ग आठ, वर्गखोल्या चार
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आजरोजी फक्त चार वर्गखोल्या आहेत; मात्र वर्ग आठवी पर्यंत आहेत. तसेच शाळेमध्ये काॅन्व्हेंटचे बाल प्रायमरी इंग्लिशचे वर्गसुद्धा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठे बसावे, असा प्रश्न पडला आहे. एका वर्ग खोलीचे मागील चार महिन्यांपासून काम अपूर्ण आहे.
----------------------
शाळेत वर्गखोल्याचे बांधकामासाठी पुन्हा प्रस्ताव पाठविला असून, स्थानिक पातळीवरून सर्व कागदपत्रसह पाठपुरावा करण्यात आला आहे.
- संजय बरडे, मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा दिग्रस बु.