मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:52+5:302021-03-17T04:18:52+5:30
मूर्तिजापूर : कारंजा लाड या मार्गाला जोडणाऱ्या मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले ...
मूर्तिजापूर : कारंजा लाड या मार्गाला जोडणाऱ्या मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
भाजपने दिलेल्या निवेदनानुसार, मूर्तिजापूर-खेर्डापर्यंत संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावर अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. या मार्गाची दुरुस्ती न झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता आहे. कारंजा-दारव्हा, पुसद-धानोरा, मंगरूळपीर-वाशिम मार्गांना जोडणारा मार्ग असल्याने मूर्तिजापूर-खेर्डा मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची रहदारी असते. तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागते. या मार्गाने मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकाला प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घेऊन या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, शहर उपाध्यक्ष कोमल तायडे यांनी निवेदनातून दिला आहे.