पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:18 AM2021-04-17T04:18:13+5:302021-04-17T04:18:13+5:30
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, तसेच अतिक्रमणामुळे अनेक पाणंद रस्ते अरुंद झाले असून, ...
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, तसेच अतिक्रमणामुळे अनेक पाणंद रस्ते अरुंद झाले असून, शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------------------------
बार्शिटाकळी तालुका होतेय कोरोना ‘हॉटस्पॉट’
बार्शिटाकळी : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यातील पिंजर परिसरात ७, तर सराळा येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुका कोरोना हॉटस्पॉट होण्याची भीती आहे.
--------------------------
पेरणीपूर्व मशागतीची लगबग!
बोरगाव मंजू : गत दहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणा अवेळी व अपुरा पाऊस झाल्याने सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल असताना यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली. शेतशिवारात वखरणीचे काम सुरू झाले आहे.
----------------------
पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा
कवठा : परिसरात असलेल्या पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दररोज अवैध उत्खनन सुरू असल्याने लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
---------------------------------------
स्वच्छतागृहांची निर्मिती करावी!
वाडेगाव : परिसरातील गावांमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. विशेषकरून याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. बसस्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
------------------------------------
भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी जागा द्या!
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. एकाच ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी व स्वच्छ जागा देण्याची मागणी भाजीपाला विक्रेत्यांकडून होत आहे.
--------------------------------------
ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री, अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. सद्य:स्थितीत दारूची दुप्पट दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे.
---------------------------------------
क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था
तेल्हारा : येथील क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. क्रीडा संकुलामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडासंकुलाची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
---------------------------------------------------